धुळे – येथील पोलिसांना अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन (फिरती न्यायवैद्यक प्रयोग शाळा) प्राप्त झाल्याने आता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा वापर करून क्राईम सीन अॅप्लिकेशन द्वारे गुन्ह्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करता येणार आहे. यामुळे गुन्हेगारांचा पुराव्यासह अचूक माग काढणे पोलिसांना शक्य होईल. धुळे पोलिसांना शासनाकडून प्राप्त झालेल्या या मोबाईल व्हॅनच्या वापराची अनुमती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बुधवारी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिली.
याव्यतिरिक्त आगामी सण,उत्सवाच्या निमित्ताने धुळे पोलिसांना आणखी दोन अद्यायावत २२ आसनाचे वाहन (बस) देण्यात आल्याने या दोन्ही वाहनांची जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे जानेवारी महिन्यात मुंबईत लोकार्पण झाले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक अशा साहित्याने सज्ज असलेली अशीच एक मोबाईल व्हॅन आता धुळे जिल्हा पोलीस दलासही प्राप्त झाली आहे. ही फॉरेन्सिक मोबाईल लॅब (व्हॅन) कार्यरत झाल्यास ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे ए’आयचा वापर करून क्राईम सीन अॅप्लिकेशनद्वारे गुन्ह्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करता येणार आहे. तपासणीदरम्यान मिळालेले पुरावे, रक्ताचे नमुने यांचे योग्यप्रकारे जतन करून बारकोडद्वारे सीसीटीव्हीच्या नजरेखाली ते सुरक्षित करण्यात येऊ शकणार आहेत. फॉरेन्सिक न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि तांत्रिक सहाय्य म्हणून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. स्फोटक पदार्थांच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी व सायबर गुन्ह्याच्या तपासणीसाठी लागणारे साहित्यही या प्रयोगशाळेत असेल. रक्त, डीएनए चाचणी नमुने आणि बलात्कारसारख्या गुन्ह्यात घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे गोळा करता येणार आहेत.
मोबाईल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही असतील. ते पोलीस कक्षाशी जोडलेले असतील. यामुळे पोलिसांना एखाद्या गुन्ह्यात गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती लगेच देता येणे शक्य होणार आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल, तेव्हा पोलीस नियंत्रण कक्ष अधिकारी फॉरेन्सिक पथकाला गुन्ह्यांची माहिती देईल. त्या माहितीच्या आधारे फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देईल. घडलेल्या गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये त्याची नोंद करण्यात येईल. व्हॅनमधील फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचेल आणि घटनास्थळचे छायाचित्र काढून त्याचे चित्रीकरण करण्यात येईल.आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (दूरदृश्य प्रणाली) चर्चा होऊ शकेल. तपास यंत्रणेच्या हाती थेट अचूक आणि ठोस पुरावाच मिळणार असल्याने काहीकेल्या संशयित गुन्ह्यातून सहज वाचणार नाहीत, असे स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितले.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. –श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)