धुळे : रायपूर (ता.साक्री) गावाजवळ दोंडाईचा रोडलगत ३३ के.व्ही. (किलोवॅट) (छावडी) विद्युत वाहिनीला कुणीतरी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या कृतीमुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला आणि मोठा अपघात टळला. या घटनेनंतर महावितरणने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की, विद्युत यंत्रणेशी छेडछाड करणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणे असून, अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रायपूर परिसरातील वीजवाहिनीवरील शॉर्टिंगचा प्रयत्न आज (रविवार दि.९) हाणून पाडण्यात आला. या भागात यापूर्वीही वीजवाहक तारा चोरीच्या काही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रकारांमुळे केवळ वीजपुरवठ्याचे नुकसान होत नाही, तर प्राणांतिक आणि अप्राणांतिक अपघातांचा गंभीर धोका निर्माण होतो.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, तारा किंवा इतर वीज उपकरणांना स्पर्श करणे किंवा छेडछाड करणे हे अत्यंत धोकादायक असून, अशा कृतींमुळे जीवघेणे अपघात होऊ शकतात. वीज वाहक तारांशी संपर्क आल्यास शरीर गंभीररीत्या भाजणे, अपंगत्व किंवा मृत्यूही ओढवू शकतो. या प्रकारांमुळे उपकरणांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित होणे आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होतो.
महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत वीज यंत्रणेशी छेडछाड करू नये आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, कंडक्टर चोरी किंवा वीज उपकरणांचे नुकसान दिसल्यास तात्काळ जवळच्या महावितरण कार्यालयास कळवावे. तसेच टोल-फ्री क्रमांककावर (१९१२,१८००- २१२- ३४३५,१८००- २३३- ३४३५) संपर्क साधावा. वीज उपकरणांशी छेडछाड करणाऱ्यांवर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कठोर शिक्षा व दंडाची तरतूद आहे.
सर्व नागरिकांनी मुलांना आणि ग्रामस्थांना वीज उपकरणांपासून दूर राहण्याचे तसेच त्याच्याशी छेडछाड न करण्याचे शिक्षण द्यावे. महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रीतम काळे यांनी सांगितले की, “वीज वितरण प्रणाली सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. कोणतीही अनधिकृत छेडछाड आढळल्यास त्वरित कळवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही.”
या घटनेने साक्री तालुक्यात सजगतेचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात वीज उपकरणांशी छेडछाड ही जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगून वीजपुरवठा यंत्रणा सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे, असा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
