धुळे : राज्य परिवहन महामंडळाची शिरपूर- शिंदखेडा बस आणि भरधाव मालमोटार यांची धडक झाल्याने शाळकरी मुलींसह बसचे चालक वाहक आणि २२ प्रवासी जखमी झाले. या अपघातात आठ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी फाट्यावर हा अपघात झाला.

शिंदखेडा आगाराची शिरपूर बस सकाळी शिंदखेडा येथे जाण्यासाठी निघाली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाशी फाट्यावर बस आली असता भरधाव मालमोटारीची बसला समोरुन धडक बसली. अपघातात नुपूर सोनवणे (आठ, रा.पाटण, शिंदखेडा) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बसचे चालक शैलेंद्र परदेशी आणि राहुल विंचुरकर यांच्यासह बसमधील २३ पैकी २२ प्रवासी जखमी झाले. दभाशी गावाजवळील वळणावर बस चालकाला समोरून भरधाव येणाऱ्या मालमोटारीचा अंदाज आला नाही. यामुळे मालमोटार बसवर धडकली, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडून देण्यात आली.

अपघातातील सर्व जखमी शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील आहेत. जखमींमध्ये वर्षा माळी,अश्विनी गायकवाड,रेखाबाई माळी,सुरेश माळी,यमुनाबाई वडार, चैताली पाटील,अरुणाबाई माळी,रतिलाल धनगर, नर्मदाबाई माळी,सुशीला बोरसे,बिलाल शेख,राहुल विंचुरकर,नाकीब खाटीक, प्रफुल्ल पवार,समीर शेख,प्रवीण पाटील, जियाउद्दीन शेख,रोहिणी महिरे, गोरख पाटील, इंदुबाई माळी,गंगुबाई माळी, शैलेंद्र आणि प्रल्हादसिंह परदेशी यांचा समावेश आहे.

अपघातात बसचा पुढील भाग दाबला गेला असून मोठा काच फुटला. वाहक आणि चालक यांच्या बाजूच्या खिडक्याही या अपघातात तुटल्या. बसची वाहक बाजू संपूर्णपणे दाबली गेली. बसचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. सर्व जखमी शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच महामंडळाचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील, १०८ रुग्णवाहिकेचे चालक विकास पवार, दीपक माळी,कैलास सूर्यवंशी,आप्पा सोनवणे,चंद्रशेखर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शिरपूर ग्रामीण तसेच धुळे येथील रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. ज्या वळणावर हा अपघात झाला, ते वळण धोकादायक मानले जाते. या वळणावर समोरुन येणाऱ्या वाहनाचा व्यवस्थित अंदाज चालकांना येत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.