धुळे – शहरातील वरखेडी रस्त्यावरील कचरा विलगीकरणाचे काम तीन यंत्रांच्या सहाय्याने केले जात आहे. यामुळे कचरा डेपोला आग लागून प्रदूषण फैलण्याची समस्या आता दूर होणार आहे. या कामाची पहाणी गुरुवारी आयुक्त देविदास टेकाळे यांनी केली.
हेही वाचा – सिन्नरच्या अपहृत बालकाची संशयितांकडून सुटका; पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, अभियंता प्रदीप चव्हाण, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त टेकाळे यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. दीड वर्षांपासून कचरा विलगीकरणाचे काम महानगर पालिकेमार्फत सुरू आहे. तथापि, आता या कामाला वेग देण्यात आला आहे. ८९ हजार क्युबिक मीटरपैकी ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. कचऱ्यातून प्लास्टिक, रबर, काच, कापड वेगवेगळे केले जात आहे. त्यासाठी तीन यंत्रांचा वापर केला जात आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे कचरा डेपो मोकळा श्वास घेणार आहे. पूर्वी कचऱ्याचे ढीग वाढल्याने आग लागण्याच्या घटना घडत होत्या. परंतु, आता कचरा डेपो मोकळा होणार आहे. मार्चनंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू केले जाईल, असे टेकाळे यांनी सांगितले.