धुळे : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या तब्बल २५ हजारांच्या घरात पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेने उपाययोजना म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार देशभरात मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्याने धुळेकरांना आणखी मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या या आदेशानुसार मोकाट कुत्र्यांचा नायनाट नव्हे तर त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार सर्व मोकाट कुत्र्यांचे प्रथम निषेधन म्हणजे (स्टेरीलायझेशन) आणि लसीकरण म्हणजे (व्हॅक्सिनेशन) करून त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत सोडावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. फक्त रॅबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांनाच शेल्टरमध्ये ठेवण्याची परवानगी आहे. इतर निरोगी कुत्र्यांना रस्त्यावरून हटविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अन्न न देता स्थानिक प्रशासनाने निर्धारित अन्न वितरण क्षेत्र (फीडिंग झोन) तयार करावेत, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

नागरिकांचे रॅबीजसारख्या आजारांपासून संरक्षण करणे आणि प्राण्यांच्या कल्याणाचा आदर राखणे हे दोन्ही उद्दिष्ट साध्य व्हावे. त्यासाठी प्रत्येक राज्य आणि महानगरपालिकेने कुत्र्यांच्या संख्येचे सर्वेक्षण करून कायमस्वरूपी नियंत्रण योजना आखावी, शेल्टर आणि लसीकरणासाठी निधी नियोजित करावा, तसेच नागरिक जनजागृती वाढवावी असे न्यायालयाने नमूद केले आहे.

या अनुषंगाने धुळे महापालिकेच्या वतीने या पूर्वीच सुरू केलेले प्रयत्न न्यायालयाच्या नव्या आदेशाचा दिशेने ठोस पावले उचलण्यात आल्याचेअदोरेखीत झाले आहे. कोल्हापूरस्थित सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेला शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि उपचाराची जबाबदारी ५ जून २०२५ पासून महापालिकेने सोपवली आहे. या संस्थेच्या विविध पथकांनी शहरातील वसाहतींमध्ये मोहीम राबवली असून दररोज सरासरी सहा ते साडेसहा वाजेपासूनच सुरू होणाऱ्या या मोहिमेत दिवसभरात साधारणपणे ४० ते ४५ कुत्रे पकडले जात आहेत.

महापालिकेने या संस्थेला वरखडे रस्त्यावरील जागा दिली असून येथे या ठिकाणी १५० ते २०० कुत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत २,८९४ नर आणि २,७४९ मादी कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून एकूण ५,६४३ कुत्र्यांवर उपचार पूर्ण झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांना आवश्यकतेनुसार दोन ते तीन दिवस उपचारासाठी ठेवले जाते, आणि त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडले जाते.ही वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याची ओळख म्हणून कुत्र्यांच्या डाव्या कानाचा भाग थोडासा कापून चिन्ह ठेवले जाते आणि त्यांना अँटीरेबीज तसेच इतर आवश्यक लसी दिल्या जातात. या प्रक्रियेसाठी दोन पशुवैद्यकीय डॉक्टर आणि १२ कर्मचारी कार्यरत आहेत.

सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शनचे व्यवस्थापक सचिन देऊळकर यांनी सांगितले की सध्या धुळे व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या सुमारे २५ हजार असावी. आगामी काळात या सर्वांवर निर्बिजीकरण, लसीकरण आणि देखरेखीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. डॉक्टर राहुल पाटील आणि त्यांचे पथक या कामासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश माणूस आणि प्राणी दोघांच्या सुरक्षेचा समतोल राखणारा असून, धुळे महानगरपालिकेने या दिशेने आरंभ केलेले प्रयत्न राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श ठरू शकतात.