धुळे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दबंग नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी वरखेडे (ता.धुळे) गावातील महादेव मंदिरात गणपती पूजन आणि रुद्राभिषेक आदी कार्यक्रम झाले.यामुळे लोकप्रिय आणि धडाकेबाज नेते राऊत यांची प्रकृती सुधारेल आणि ते ठणठणीत होतील असे यावेळी सांगण्यात आले.

पत्रकात म्हटल्यानुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या लढाऊ बाण्याच्या नेत्याच्या आरोग्यलाभासाठी संपूर्ण वरखेडे गाव एकत्र आले. संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खरे शिलेदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा पक्षाच्या कार्यात सक्रिय व्हावेत, या हेतूने १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. गावातील गोडाऊन चौक येथील महादेव मंदिरात आयोजित या धार्मिक कार्यक्रमात गावकऱ्यांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या वेळी प्रशांत कुलकर्णी, प्रथमेश माऊली, अशोक कुरवेलकर, ओमकार जोशी आणि निखिल जोशी या पाच पुरोहितांनी वेदमंत्रोच्चारात गणपती पूजन व रुद्राभिषेक संपन्न झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख शांताराम माळी यांनी सहपत्नीक पूजन केले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, वंजी चौधरी, रामदास माळी, उपमहानगरप्रमुख विजय चौधरी, गजेंद्र पाटील यांच्या हस्ते गणपती व महादेवाची आरती करण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे शहर सहसंघटक आनंद जावडेकर, विभागप्रमुख विष्णू जावडेकर, प्रशांत भामरे, चंद्रकांत शिंदे, शाखाप्रमुख इश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र शेअर केले होते. त्यात आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन, असे त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.