नाशिक : श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावल्यावरून रविवारी रात्री मोठा वाद झाला. सतीश शुक्ल व चंद्रशेखर पंचाक्षरी गटाच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. तीन ते चार तास चाललेल्या वादाने रामकुंड परिसरात गोंधळ उडाला. अखेर या वादात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पुरोहित संघावरील वर्चस्वावरून शुक्ल आणि पंचाक्षरी गटात संघर्ष धुमसत आहे. संघाच्या कार्यालयाबाहेर एका गटाने कार्यकारिणी फलक लावण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या गटाने त्याला विरोध दर्शविला. यामुळे दोन्ही गटाचे पदाधिकारी व सदस्य समोरासमोर आले. बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने तणावाची स्थिती निर्माँण झाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप केला.

अलीकडेच झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी संस्थेच्या विरोधात कारवाई करीत असल्याने सतीश शुक्ल व अन्य दोन विश्वस्तांंना कायदेशीर कारवाई करून पदमुक्त केल्याचा दावा एका गटाकडून केला जातो. सतीश शुक्ल यांनी घेतलेल्या बेकायदा सभेत १५ तीर्थ पुरोहित देखील उपस्थित नव्हते. नव्या कार्यकारिणी तयार करून त्याची रितसर धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यास अहवाल सादर करण्यात आल्याचे पंचाक्षरी गटाकडून सांगण्यात आले.

या घटनाक्रमानंतर सतीश शुक्ल यांनीही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. कोणी काहीही दावे केले तरी आपलीच कार्यकारिणी म्हणजे पुरोहित संघ असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. आपण बैठक, पत्रकार परिषद घेऊ नये म्हणून धमक्यांचे संदेश पाठविले गेल्याचा आरोप त्यांनी केला. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपद सतीश शुक्ल यांनी स्वताकडे ठेवले असून मुलगा प्रतिक शुक्ल यांना सचिव केले आहे. नव्या कार्यकारिणीतून पंचाक्षरी यांच्यासह तीन सदस्यांना वगळल्यानंतर वाद वाढल्याचे दिसत आहे.

तीर्थ पुरोहितांचे दोन गट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी सि्ंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघात तीर्थ पुरोहितांचे दोन गट पडले आहेत. १८ जुलै रोजी शौनक आश्रमात झालेल्या सभेत सभासदांनी सतीश शुक्ल यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले होते. प्रदीर्घ काळापासून शुक्ल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांच्याकडून वस्त्रांतर गृह आणि पुरोहित संघाचे कार्यालय वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वापरत जाते, अशी तक्रार सभासदांनी केली होती. पुरोहित संघाच्या वस्त्रांतर गृहाचा वापर पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यावर कर्मकांडासाठी केला जातो, परंतु यासाठी संघाची मोठ्या रकमेची पावती फाडावी लागते, यावरही काहींनी आक्षेप घेतला. शुक्ल यांच्या कार्यकाळात सभासद नोंदणी झाली नाही. त्यामुळे सभेत ३८ वर्षानंतर नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात मान्यता देण्यात आली.