नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दीपावलीचे निमित्त साधून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील इच्छुकांकडून दीपावली शुभेच्छा भेटकार्ड, लक्ष्मीचे चित्र असलेले कार्ड, आकाशकंदील, पणत्या, सुगंधी उटणे, काही उच्चभ्रू भागात फराळाचे पाकीट यांचे वाटप करण्यात येत आहे. काही लोकप्रतिनिधींकडून दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट, पाडवा पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे आणि जळगावात शुभेच्छाकार्ड देण्यावरच अधिक भर राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक महापालिका निवडणूक कधी होईल ते अद्याप अनिश्चित असले तरी निवडणुकीची तयारी इच्छुकांकडून वेगवेगळय़ा पद्धतीने करण्यात येत आहे.  मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधले जात आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता दीपावलीचे निमित्त त्यांना मिळाले आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांकडून घरोघरी दीपावली शुभेच्छाकार्डे देण्यात येत आहे. त्यातही ऐन वेळी पक्ष बदलण्याची वेळ आल्यावर फजिती होऊ नये म्हणून पक्षचिन्ह न वापरता स्वत:ची छबी वापरण्याची दक्षता घेण्यात आली आहे. महात्मा नगर, कॉलेज रोड यांसारख्या उच्चभ्रू भागात माजी नगरसेवकांकडून फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. काही इच्छुकांनी पणत्या तसेच लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीचे चित्र आवश्यक असल्याने चित्र असलेल्या कार्डाचे वाटप केले आहे. काहींनी घरोघरी आकाशकंदील दिले आहेत. याशिवाय सुगंधी उटणेही देण्यात येत आहे. भाजपशी संबंधित एका इच्छुकाने इंदिरानगर भागात कौटुंबिक सापशिडीचे वाटप केले आहे. अर्थात त्यासाठी भ्रमणध्वनी काही वेळ बाजूला ठेवून दीपावलीनिमित्त कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन खेळात रममाण होण्याचे कारण देण्यात आले आहे.

काही लोकप्रतिनिधींकडून दीपावलीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते या मंडळींकडून दिवाळी पहाट, पाडवा पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांशी संबंधित संस्था, संघटनाही याबाबतीत आघाडीवर आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. नाशिकमध्ये ही स्थिती असताना धुळे, जळगाव या शहरांमध्ये मात्र लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळी शुभेच्छाकार्डाचा अधिक वापर करण्यात येत आहे. काही ठरावीक संस्था, संघटनांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी त्यांचा राजकीय मंडळींशी फारसा संबंध नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali background of the upcoming municipal elections voters greeting card ysh
First published on: 26-10-2022 at 00:02 IST