मालेगाव संवेदनशील असले तरी या ठिकाणी अधिक लक्ष दिल्यास करोना फैलावामुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात राहील, असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. करोनामुळे अन्य रुग्णांची फरफट होऊ नये यासाठी खासगी दवाखाने सुरू करणे तसेच मुंबईच्या धर्तीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी डॉक्टरांचे कृती दल स्थापन करण्याचीही घोषणाही त्यांनी केली.
करोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात करोनाचे केंद्र ठरलेल्या मालेगाव येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले. टोपे यांनी मालेगाव येथील परिस्थिती संवेदनशील असली तरी नियंत्रणात येण्यासारखी असल्याचे सांगितले. आरोग्य विभागातील रिक्तपदांचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रेंगाळली असली तरी माहिती तंत्रज्ञान विभाग अडचण दूर करत असल्याचे टोपे यांनी सांगितले. मालेगावात गंभीर रुग्ण नाहीत. धार्मिक गुरू, लोकप्रतिनिधी यांची मदत घेऊन उपचारासाठी लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. स्थलांतरीत मजुरांविषयी त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असून नियोजन करून त्यांना गावी पाठविले जाईल, असे त्यांनी सांगितले. मालेगावात अतिरिक्त पोलीस, वैद्यकीय अधिकारी अशी सर्व सेवा सुविधा राज्य शासन देईल. या ठिकाणी जास्तीजास्त सव्र्हेक्षणांवर भर देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
अटी आणि शर्ती, निकषांचे पालन आणि रक्तदाता-रुग्ण याबाबत योग्य नियोजन झाल्यास ‘रक्तद्रव उपचार पद्धती यशस्वी होते. मुंबई येथे लिलावती हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग झाला. या उपचार पद्धतीचे यश पाहता पुण्यासह अन्य ठिकाणी हा प्रयोग होऊ शकतो. तसेच, ८३ टक्के रुग्णांना करोनाची लक्षणे नाहीत. त्यांना आयएमसीआरच्या नव्या निकषानुसार सक्तीने घरीच अलगीकरण करण्यात येईल. जेणेकरून अन्य रुग्णांसाठी खाटांचा प्रश्न भेडसावणार नाही.
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्य़ांत १५६ आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्यावर हल्ले झाले आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र काम करणाऱ्यांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. आधी प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा पोलिसी खाक्या दाखवा, अशी मोकळीक पोलिसांना दिली आहे.
– अनिल देशमुख, गृहमंत्री