नाशिक : धरणांचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या इगतपुरीत जोरदार पाऊस कोसळल्याने धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासात १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विसर्ग करण्यात आलेले सर्व पाणी मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणाकडे जात आहे. या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत लवकर धरणे भरली आहेत. इगतपुरी तालुक्यात आठ दिवसांपासून संततधार सुरु आहे. ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस यावर्षी झाला आहे. २० ऑगस्टपर्यंत यावर्षी आतापर्यंतच्या पावसाळ्यात ३०८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे भातशेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी भात रोपे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा संधी मिळाली नाही. दारणा, भाम आणि वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये पसरल्याने भाताच्या रोपांना आणि इतर पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागात भाताची रोपे वाहून गेली. दारणा, भाम आणि वाकी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या भागात चार दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम असून काही भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. घोटी, इगतपुरी आणि परिसरात संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोटी बाजारपेठेत शांतता आहे. दमदार पावसामुळे दारणा धरणाच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील अतिपावसाच्या भागात पावसाने पाच दिवसांपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर आणि परिसरासह कसारा घाट, पश्चिम भागातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, आवळखेड, भाम परिसर चिंचलेखैरे तसेच पूर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली, मुकणे, जानोरी, नांदगाव, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, वाडीवऱ्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकुर, शेणीत, माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी, इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने पश्चिम आणि पूर्व भागातील मानवेढे, काळुस्ते, वैतरणा परिसरातील शेती जलमय झाल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात ३०८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तसेच तालुक्यातील पिंपरीसदो पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भावली आणि आजुबाजुकडे जाणाऱ्या वाडी, वस्तीकडे जाणाऱ्या जवळपास १० ते १२ गावांकडे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी झाल्यास संपर्क होतो, पाणी वाढल्यास पुन्हा संपर्क तुटतो, अशी स्थिती आहे.