लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ते स्वत: आता राज्यात विभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून हा फडणवीस आणि बावनकुळे यांना इशारा आहे, असा चिमटा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीचा विभागनिहाय आढावा घेत आहेत. त्या अंतर्गत बुधवारी शहा यांच्या उपस्थितीत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने नाशिक येथे आलेले जयंत पाटील यांनी यासंदर्भातील प्रश्नावर भाजप नेत्यांना टोले हाणले. भाजपची ही पक्षांतर्गत बैठक आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षश्रेष्ठी आढावा घेतील. विधानसभेत किती जागा पडणार, याचा अंदाज बांधतील, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

आणखी वाचा-अस्मिता पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी गरजेची, जयंत पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मृत्युविषयी पाटील यांनी शंका उपस्थित केली. अक्षय शिंदे या नराधमाला टोकाचे प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते, यात कोणाचे दुमत नाही. प्रारंभी हे प्रकरण दाबण्यासाठी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संस्थाचालकांनी का प्रयत्न केला, त्यांना कोणाला संरक्षण द्यायचे होते, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब का लावला, असे प्रश्न उपस्थित करुन संस्थाचालक आणि गुन्हा न नोंदविणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी पाटील यांनी केली.