‘गरोदरपूर्व काळजी ’ पथदर्शी प्रकल्पाचा लाभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चारूशीला कुलकर्णी, नाशिक

माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग, भारती विद्यापीठ आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने भारतातील पहिला ‘प्री कन्सेप्शनल केअर-मॅटर्नल अ‍ॅण्ड चाईल्ड’ अर्थात गरोदरपूर्व काळजी हा पथदर्शी प्रकल्प नाशिक जिल्ह्य़ात सुरू करण्यात आला आहे. याकरिता आदिवासीबहुल पेठ आणि सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत साडेतीन हजारहून अधिक महिलांपर्यंत आरोग्य विभाग सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोहचले असून सर्वेक्षणात महिलांमधील वाढती व्यसनाधिनता, कमी वजन यासह हिमोग्लोबीनची कमतरता निष्पण्ण झाली आहे. गर्भधारणेपूर्वी यावर उपचार केला जात असल्याने सुरक्षित मातृत्वच्या दिशेने वाटचाल होत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

जंतुसंसर्ग, कुपोषण, हृदयरोग, कमी वजनाचे बाळ यासह अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे होणारे बालमृत्यू विशेषत शून्य ते एक वर्ष वयोगटातील अर्भक मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. राज्यात हा दर हजारामागे १३ असून यातील बहुतांश बालके कमी वजनाची असल्याने दगावत असल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून पेठ आणि सिन्नर तालुक्यात ‘गरोदरपूर्व काळजी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

दोन वर्षांसाठी हा उपक्रम असून वर्षभरात आरोग्य विभाग आरोग्य सेविकांच्या माध्यमातून तीन हजार ५०० महिलांपर्यंत पोहचले आहे. यामध्ये आरोग्य विभाग महिलांकडून निळ्या आणि पिवळ्या रंगातील अर्ज भरून घेत आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या अर्जात गर्भधारणा असेल किंवा या काळात गर्भपात, कमी वजनाचे बाळ, व्यंग किंवा अन्य काही अडचण आली आहे काय, या माहितीचा समावेश आहे. पिवळ्या अर्जात ज्यांना आई व्हायचे आहे त्यांची माहिती भरून घेण्यात येत आहे.

सर्वेक्षणासाठी आदिवासी, ग्रामीण भागातील १८ ते २५ वयोगट लक्ष्यगट ठेवला गेला. त्यात विविध व्याधी, व्यसनाधिनता लक्षात घेऊन त्यावर काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १७०० महिलांचा लक्ष्यगट करून त्यांच्यातील बीएमआय (बॉडी मास इंडेक्ट) २४ पर्यंत आणण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शियमसह अन्य गोळ्या सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या एचआयव्ही, थॉयराईडसह अन्य वेगवेगळ्या चाचण्या होत आहेत.

गर्भधारणेपूर्वीच वेगवेगळे उपचार मिळत असल्याने महिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. जन्मत बाळाचे कमी वजन, कुपोषणासह अन्य वेगवेगळ्या समस्यांवर या माध्यमातून नियंत्रण मिळवणे शक्य आहे. याविषयी सिन्नरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी पहिल्या टप्प्यात महिलांचा बीएमआय सर्वसामान्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. ज्यांचा कमी आहे तो २४ वर यावा आणि ज्यांचा २४ पेक्षा जास्त आहे, तो २४ वर यावा यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी लक्ष्यगट ठरवत आशांच्या सहाय्याने महिलांमध्ये आरोग्यविषयक प्रबोधन करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमाला महिला प्रतिसाद देत आहे. मात्र महिलांमधील व्यसनाधिनता, हिमोग्लोबीनची कमतरता यावर काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्याधी आणि व्यसने

या प्रकल्पांतर्गत १८ ते २५ वयोगटातील महिलांचे सर्वेक्षण झाले. यातील बहुतांश महिलांचे वजन आणि उंची कमी आहे. वैद्यकीयदृष्टय़ा त्यांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कमी असल्याने प्रसुतीपूर्व त्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते हे लक्षात आले. तसेच, यातील काही महिलांना मिस्त्री लावण्याची सवय असून त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होत आहे. काहींना हिमोग्लोबीनची कमतरता असून रक्तदाबासह, थॉयरॉईडचा त्रास आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to pre pregnancy treatment moving on to safe motherhood zws
First published on: 31-07-2019 at 02:12 IST