लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. परिमंडळ एक अंतर्गत ५२ गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यातच लोकसभा निवडणूक आल्याने शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत परिमंडळ एक अंतर्गत उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी ५२ गुन्हेगारांविरुध्द नाशिक जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली आहे. यामध्ये गोमांस विक्रेते, सार्वजनिक शांतता भंग करणारे यासारख्या गुन्हेगारांचा समावेश आहे.

आणखी वाचा-स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती

विशेष बाब म्हणजे काही संवेदनशील प्रकरणात सराईत गुन्हेगारांच्या मित्रांना देखील तडीपार करण्यात आले आहे. जानेवारी २०२४ मध्ये म्हसरुळ परिसरात एका सेवानिवृत्त जवानाचा गुन्हेगाराबरोबर झालेल्या झटापटीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेले तीन गुन्हेगार अद्याप कारागृहात आहेत. घटनेपूर्वी गुन्हेगारांचे सहा मित्र त्यांच्याबरोबर एकत्र दारू पिण्यास बसले होते. गुन्हेगारांचे मित्रही अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता लक्षात घेता या सहा व्यक्तींनाही त्यांच्यावर गुन्हा दाखल नसतांनाही तडीपार करण्यात आले आहे.