अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक – राजकीय पातळीवरून दबाव वाढल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून झालेल्या विसर्गात दुष्काळात सुमारे साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होण्याचा अंदाज आहे. जायकवाडीतील मृतसाठ्यातील पाणी वापरण्याचा पर्याय न स्वीकारल्याने नाशिक आणि अहमदनगरमधील सुमारे १५ हजार हेक्टरवरील शेतीला फटका बसणार आहे. या विसर्गासाठी महामंडळाने २८०० दशलक्ष घनफूटचा वहनव्यय गृहीत धरला. प्रत्यक्षात तो सुमारे साडेतीन हजार दशलक्ष घनफूटवर जाण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळी वर्षात पाण्यावरून नाशिक, नगर आणि मराठवाड्यात संघर्ष सुरू आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. चार आठवड्यानंतर शुक्रवारी रात्री नाशिकमधील दारणातून विसर्ग करण्यात आला. नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले. रविवारी सकाळी गंगापूर, कडवा व मुकणे धरणातून प्रत्येकी ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
आणखी वाचा-नाशिक – कौटुंबिक वादातून दाम्पत्याची आत्महत्या
गोदावरीसह दारणाचे पात्र कोरडेठाक असताना सोडलेल्या पाण्यामुळे साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होणार आहे. साधारणत: रब्बी हंगामासाठी एक दशलक्ष घनफूट पाण्याने सव्वा चार हेक्टरवरील क्षेत्र भिजते, असा शासनाचा मापदंड आहे. त्यानुसार विसर्गात अपव्यय होणाऱ्या पाण्याचा विचार करता १५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला झळ बसणार असल्याचे जाणकारांकडू सांगितले जाते. या पाण्याचा लाभ ना मराठवाड्याला होईल, ना नाशिक आणि नगरला, याकडे संबंधितांनी लक्ष वेधले आहे.
नाशिक आणि नगरमधील धरणांमधून जायकवाडीत ५८०० दशलक्ष घनफूट पाणी येणे अपेक्षित आहे. नाशिकच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नदीपात्रात काहीअंशी पाणी असल्याच्या दिलेल्या अहवालावरून २८०० दशलक्ष घनफूट म्हणजे साधारणत: ३० ते ३५ टक्के वहनव्यय गृहीत धरण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यास वरील भागातील धरणांमधून अधिक पाणी सोडण्याचे आदेश द्यावे लागले असते. गोदावरी नदीवर सुमारे २० बंधारे आहे. विसर्गाने तेही भरले जातील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय झाला, असे म्हणता येणार नाही, असे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा-नाशिक विभाग शिक्षक मतदारांच्या यादीत त्रुटी असल्याची तक्रार
अपवादात्मक परिस्थितीत यापूर्वी तीन वेळा जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्यात आला आहे. या वर्षी तोच पर्याय स्वीकारण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यास भाग पाडण्यात आले. नदीपात्र कोरडे असल्याने सुमारे साडेतीन हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ४० ते ४५ टक्के पाण्याचा अपव्यय होईल. जायकवाडीत पावणेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी पोहोचणार आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना केवळ कायदेशीर हक्क आहे म्हणून पाणी सोडण्याने मोठे नुकसान होणार आहे. -उत्तम निर्मळ (माजी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग)