नंदुरबार : धनत्रयोदशीनिमित्त जिल्ह्यातील अस्तंबा पर्वतावर भरणाऱ्या यात्रेहून परतणाऱ्या एका खासगी मालवाहू वाहनास नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भारतात अश्वत्थामाचे स्थान कुठेही नमुद नसले तरी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेत चार हजार फुट उंच पर्वतावर अस्तंबा ऋषी नावाने त्याचे स्थान आहे. शापस्थ अवस्थेतील जखमी अश्वत्थामा दऱ्याखोऱ्यात तेल मागतो आणि वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरुला मार्गदर्शन करतो, अशी दंतकथा असल्याने दरवर्षी धनत्रयोदशीपासून दोन दिवस हजारो भाविक अस्तंबाच्या यात्रेसाठी मार्गस्थ होतात. जवळपास चार हजार ३०० फुट उंचीवर वसलेल्या शूलपाणीच्या झाडीमधल्या डोंगराच्या माथ्यावर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक येतात.

शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एक शिळा आहे. त्याची भाविक पूजा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. शिखरावर अतिशय कमी जागा असली तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. दिवाळीच्या पर्वात होणाऱ्या या यात्रेसाठी भाविकांच्या जत्थेच्या जत्थे रवाना होतात. तळोदा शहरातून कोठार-देवनदी-असली-नकट्यादेव- जुना अस्तंभा-भीमकुंड्या या मार्गाने चालत यात्रेला जातात. जंगली श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे, मशाली अशा दीर्घ काळ जळणाऱ्या वस्तू या यात्रेत बरोबर घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करून अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेऊन ध्वज लावतात. या ठिकाणी डोंगरावर येणारी रोषा ही वनस्पती तोडून बरोबर घेतात. आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्र येऊन ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढतात.

शनिवारी पहाटे धनत्रयोदशीनिमित्त अस्तंबा पर्वतावर भरणाऱ्या यात्रेहून भाविकांना घेऊन एक खासगी मालवाहू वाहन निघाले. सकाळी नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात वाहन आले असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या वाहनात सुमारे ४० भाविक होते, असे सांगण्यात येते. वाहनाखाली अनेक जण दबले गेले. आतापर्यंत या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. मयत आणि जखमींपैकी अनेक जण नंदुरबार जिल्ह्यातील भुराटी आणि शहादा तालुक्यातील वैजाली येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.