scorecardresearch

जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणूक ; एकनाथ खडसे- मंगेश चव्हाण यांचे आरोप-प्रत्यारोप

शासनाने २९ जुलै २०२२ रोजी माझी दूध संघाच्या प्रशासकपदी नियुक्ती केली.

जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणूक ; एकनाथ खडसे- मंगेश चव्हाण यांचे आरोप-प्रत्यारोप
मंगेश चव्हाण -एकनाथ खडसे photo source : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निवडणूक प्रचार आता शीगेला पोहचला असून आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे.  २९ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान शासनाने नियुक्त प्रशासक मंडळाच्या काळातच ब श्रेणी तूप लोणी विनानिविदा विकण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला असताना आ. मगंश चव्हाण यांनी आपण एक पैशाचाही अपहार केला नसल्याचे प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा >>>‘विकासालाच जनतेचा कौल’: गुजरात निवडणूक निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

संचालक मंडळाची बदनामी करण्यासाठी अपहार झाल्याचा बनाव करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी करीत त्यासंदर्भात प्रशासक मंडळासह त्यांना सहकार्य करणार्‍या सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याची माहिती आमदार खडसेंसह संचालक जगदीश बढे यांनी दिली.

शहरात खडसेंनी आपल्या निवासस्थानी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशासक तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेली तक्रार दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला. दूध संघात १८०० किलो ब श्रेणी तुपाची निविदा न काढता ते चॉकलेट तयार करणार्‍या फॅक्टरीस विकले. यासाठीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुपाचा हा अपहार २९ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत झाला आहे. या काळात दूध संघात शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे आमदार मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, अजय भोळे, अमोल चिमणराव पाटील, अरविंद देशमुख, राजेंद्र राठोड, अशोक कांडेलकर, गजानन पाटील, अमोल शिंदे, विकास पाटील हे होते. त्यांच्यासह दूध संघातील काही अधिकारी व कर्मचारी होते. या सर्वांनीच अपहार केल्याचा आरोप खडसेंनी केला.

पराभव दिसत असल्यानेच खडसेंचे आकांडतांडव – मंगेश चव्हाण

मी मुलाची शपथ घेऊन सांगतो, एक पैशाचाही अपहार केला नाही. तुम्हीही मुलाची शपथ घेऊन सांगा. दूध संघातील अपहाराचे अटकसत्र हे खडसे कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचले आहे. त्यांची अटक अटळ आहे. त्यामुळे खडसेंचा आकांडतांडव सुरू आहे, असे खडसेंच्या आरोपांना आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुरुवारी चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खडसेंनी जिल्ह्यातील ७० बहुजन नेत्यांना संपविले. मी घाबरणार नाही. खडसेंचा निकटवर्तीय जगदीश बढे याने एजन्सीच्या नावाखाली दोन लाख रुपये घेतले. आता खडसेंना पराभव समोर दिसत असल्यानेच हे प्रकार घडत आहेत. शासनाने २९ जुलै २०२२ रोजी माझी दूध संघाच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. ३२ दिवसांच्या कार्यकाळात पहिल्या पंधरा दिवसांत आमच्याकडून अपहाराची पहिली फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला. अनेक वर्षांपासून हे ब श्रेणी तूप विठ्ठल-रुक्मिणी एजन्सीला विकले जात होते.  अनिल अग्रवाल यांना ते तूप विकले गेले. त्यांनी ते लेखी स्वरूपात मान्य केले आहे. अध्यक्षा आणि कार्यकारी संचालकांच्या सांगण्यावरून अपहार झाल्याचे कबुली जबाब देण्यात आल्याचे समजत आहे. खडसे हे दिशाभूल व संभ्रम निर्माण असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:50 IST

संबंधित बातम्या