नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की नाही, हे निश्चित नसल्याने स्वबळ आजमविण्याची वेळ आल्यास तयारीत राहण्यासाठी महायुतीतील तीनही पक्ष कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने (एकनाथ शिंदे) अलीकडेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी टाकून विश्वास दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटातून काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करणे ही रणनीतीही त्यातलीच. ठाकरे गटात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करणारे विलास शिंदे यांना आता जिल्हाप्रमुख नव्हे तर, संपर्कप्रमुख म्हणून संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी काही माजी नगरसेवकांसह ठाणे गाठून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.  ठाकरे गटात असताना महानगरप्रमुख पदापर्यंत राजकीय झेप घेतली असतानाही विलास शिंदे हे नाराज का, असा प्रश्न ठाकरे गटाकडून विचारला गेला होता. ३० वर्षांपासून  शिवसैनिक म्हणून काम केलेल्या शिंदे यांनी त्याचे उत्तरही दिले होते. शिवसैनिकांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जात नसल्याची त्यांची भावना होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठीही विलास शिंदे इच्छुक होते. तसेच जिल्हाप्रमुखपद आपणास मिळावे, अशीही त्यांची अपेक्षा होती. महत्त्वाच्या पदांवर आपला अधिकार असताना ती दिली गेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत आपण चांगले काम केल्याने ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निवडून आले, असे म्हणणे त्यांनी मांडले होते. ठाकरे गटाच्या बैठकीतही आपण आपली भावना व्यक्त केली होती. आपली भावना व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, असा प्रश्नही त्यांनी केला होता.

ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचवेळी ठाकरे गटात जिल्हाप्रमुखपद न मिळाल्याने नाराज होणाऱ्या विलास शिंदे यांना शिंदे गटात कोणते मोठे पद मिळणार, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानुसार  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असणार हे निश्चित. संपर्कप्रमुख म्हणून पुढील आठवड्यात नाशिकमध्ये बैठक घेण्याचे विलास शिंदे यांनी नमूद केले आहे. संपर्कप्रमुख असलेल्या विलास शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान असेल ते पक्षातील गटबाजी रोखण्याचे. काही महिन्यांपासून शिंदे गटातील गटबाजी चर्चेत आहे. त्यामुळे नव्याने शिंदे गटात प्रवेश करणारे अनेक जण निराश असल्याचेही म्हटले जाते. अशा मंडळींना पक्षाच्या कामासाठी शिंदे यांना प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. मनसे आणि ठाकरे गट यांनी एकत्रितरित्या महापालिका निवडणूक लढविल्यास त्या आव्हानालाही शिंदे यांना सामोरे जावे लागणार आहे.