नाशिक – राज्याचे नगर विकास खाते आपल्याकडे आहे. महानगरपालिका आपल्या अखत्यारीत येतात. वारंवार सांगूनही अधिकारी ऐकत नसतील तर, मनमानीपणा सहन केला जाणार नाही, नाशिक मनपा आयुक्तांना सांगून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

शिवसेनेच्यावतीने (एकनाथ शिंदे) येथे बुथप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीपूर्वी शिवसेनेचे उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, प्रभारी संपर्क प्रमुख विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदींनी शहरातील खड्डेमय रस्ते तसेच कुंभमेळ्याची कामे क्लब टेंडरिंगद्वारे काही विशिष्ट ठेकेदारांना मिळाल्याची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खड्ड्यांच्या प्रश्नांवरून महापालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली.

कुंभमेळ्याचे संपूर्ण नियोजन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या अखत्यारीत सुरू आहे. त्यांनीही मागे कुंभमेळ्याच्या कामात काही कामे एकत्रित स्वरुपात (क्लब टेंडरिंग) द्यावी लागल्याची कबुली दिली होती. परंतु, गुजरातच्या ठेकेदारांना कामे दिल्याचे आक्षेप फेटाळले होते.

ठेकेदार संघटनांनी सिंहस्थाची छोटी, छोटी कामे एकत्रित करून ती गुजरातमधील बड्या ठेकेदारांना दिली गेली, स्थानिकांना डावलण्यात आल्याचे आरोप यापूर्वीच केले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी विशिष्ठ मोठ्या ठेकेदारांना कमो मिळावीत, यासाठी प्रयत्नशील असल्याची तक्रार केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या तत्वांच्या विरोधात जाऊन अधिकाऱ्यांनी क्लब टेंडरिंग पद्धत सुरू केल्याकडे त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी कुंभमेळा मंत्री समिती स्थापन करण्यात आली असली तरी तिची अजून एकदाही बैठक झालेली नाही. महायुतीतील संघर्षात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही.

कुंभमेळामंत्री महाजन हे जणू पालकमंत्री असल्याच्या थाटात कारभार करू लागल्याने मित्रपक्षांच्या गोटात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावरून वेगळाच खड्डा भरण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला. नगरविकास खाते, महानगरपालिका आपल्या अखत्यारीत येतात. लोकांना सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांना पगार मिळतो. कुठल्याही अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास त्याला निलंबित केले जाईल, असे त्यांनी सूचित केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा महापालिका अधिकाऱ्यांबरोबर प्रशासकीय यंत्रणांवर पकड मिळवणाऱ्या कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाही मानला जात आहे.