जळगाव – देशांतर्गत सायबर फसवणुकीचे प्रकार अलिकडे वाढले असताना, त्यापुढे जाऊन थेट विदेशातील नागरिकांना बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचे काम जळगावात सुरू होते. जळगाव ते कॅनडा व्हाया ममुराबाद फार्म हाऊस आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविणारे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या धाडसामुळे जळगावचे नाव सगळीकडे चर्चेत देखील आले आहे.

ललित कोल्हे वयाच्या २१ व्या वर्षी १९९६ मध्ये पहिल्यांदा जळगाव नगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक बनले होते. तेव्हापासून २०१७ पर्यंत सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत असताना राजकीय महत्वाकांक्षेतून त्यांनी २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर पहिली विधानसभा निवडणूक लढली होती. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी जळगाव शहरातून पुन्हा मनसेची उमेदवारी केली. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचीही सभा जळगावात झाली होती. परंतु, दोन वेळा लढल्यावरही कोल्हे यांचे आमदारकीचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

आमदारकीचा नाद सोडून त्यांनी नंतरच्या काळात जळगाव महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले. २०१७ मध्ये ते खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने जळगावचे महापौर सुद्धा बनले. मनसेची शिडी वापरून नगरसेवक ते थेट महापौर पदापर्यंत मजल मारल्यावर २०१८ मध्ये ललित कोल्हे यांनी काही नगरसेवकांना बरोबर घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, भाजपमध्येही ते जास्त दिवस रमले नाहीत. सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेले कोल्हे जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच, बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

जळगावपासून दोन किलोमीटर अंतरावर कोल्हे परिवाराचा एल.के. फार्म हाऊस आहे. त्याच ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी रविवारी छापा टाकला होता. पोलिसांच्या कारवाईत ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले.

कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी अटक केलेले संशयित हे कोलकातासह इतर राज्यातील आणि मुंबईचे रहिवाशी आहेत.

यापूर्वी, विविध प्रकरणांवरून माजी महापौर ललित कोल्हे यांच्या विरोधात पोलिसांत दाखल गुन्ह्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यात आता पुन्हा संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत दाखल गुन्ह्याची भर पडली आहे. कोल्हे आणि सर्व संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर चार ऑक्टोबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

संबंधितांकडून कॅनडासह इतर देशातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केलेल्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून वळविलेल्या पैशांतून आधी क्रिप्टो करन्सी खरेदी केली जात असे. त्यानंतर क्रिप्टो करन्सीचे भारतीय चलनात रूपांतर करून तो पैसा थेट हवालामार्गे कोल्हे यांच्याकडे मुंबईत पाठविण्याची व्यवस्था असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.