नाशिक : समाजमाध्यमावर सक्रिय राहणे ६० वर्षीय महिलेला महागात पडले. फेसबुकवरील मित्राने विश्वास संपादन करीत महिलेचे सव्वा तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या बाबत भगूर बसस्थानक परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेने तक्रार दिली. विनय भिडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित फेसबुक मित्राचे नाव आहे. समाजमाध्यमावर सक्रिय असणाऱ्या महिलेची काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून संशयिताशी ओळख झाली होती. दोघांत सातत्याने बोलणे होत असल्याने त्याने अधुनमधून व्यवसायानिमित्त नाशिकला येत असल्याचे सांगितले. महिलेनेही या मित्रास आपल्या घरी येण्याचा आग्रह धरल्याने ही फसवणूक झाली.

दुपारी सुटाबुटातील संशयिताने महिलेचे घर गाठले. महिलेनेही आपली नणंद व मोलकरणीच्या मदतीने मित्रासाठी सुग्रास भोजन केले. दोन अडिच तास उभयतांमध्ये गप्पा रंगल्या. संशयिताने विश्वास संपादन करीत महिलेच्या अंगावरील दागिने बदलून देण्याची ग्वाही दिली. संशयिताच्या आमिषाला बळी पडलेल्या महिलेने हातातील सोन्याच्या बांगडया, पाटल्या व हिरे जडित अंगठी असे सुमारे सव्वा तीन लाख रूपये किंमतीचे दागिने संशयिताच्या स्वाधीन केले. नव्याने दागिने घडवून आणण्यासाठी गेलेला अनोळखी संशयित २४ तास उलटूनही घरी परतला नाही. यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन चोरीचे सत्र कायम

शहरातील वाहन चोरीचा आलेख दिवसागणिक उंचावत असून मागील काही दिवसांत पुन्हा वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या. पहिली घटना गणेश वाडीतील संत सावता माळी अपार्टमेंट येथे घडली. या बाबत विशाल तांबे यांनी तक्रार दिली. इमारतीच्या वाहनतळात उभी केलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वार परिसरात घडली. या बाबत रवींद्र कामडी यांनी तक्रार दिली. कामडी गेल्या २६ जुलै रोजी महिंद्रा कंपनी भागात गेले होते. प्रवेशद्वार क्रमांक तीनसमोर त्यांनी आपली मोटारसायकल उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. या बाबत मच्छींद्र कापसे यांनी तक्रार दिली. घरासमोर उभी केलेली त्यांची मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चेतन भावसार यांची मोटारसायकल परबवगरमधील शुभंम करोती अपार्टमेंटच्या वाहनतळातून चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.