धुळे : ‘ मी सैन्य दलातील अधिकारी बोलतोय… ‘ अशी सुरुवात करून एकाने सैन्यदलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावयाची असल्याचे सांगून एका डॉक्टरशी संपर्क साधला. आणि डाॅक्टरच्या बँक खात्यातून परस्पर ९८ हजार ९६९ रुपये काढून घेतले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच संबंधित डाॅक्टरने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे ८३ हजार रुपये वाचविण्यात यश आले.

धुळे शहरातील डॉ. प्रशांत देवरे यांच्यावर हा प्रसंग गुदरला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ ऑगष्ट रोजी एका पॅथॉलॉजी लॅबची ओळख देत एका व्यक्तीने डॉ. प्रशांत देवरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. ‘मी सैन्यातील अधिकारी बोलत असून आम्हाला आमच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सामूहिक वैद्यकीय तपासणी करावयाची आहे. आपण आम्हाला सवलतीच्या दरात या तपासण्या करुन द्याव्यात ‘ अशी विनंती संबंधिताने केली. या बोलण्यावर डॉ. देवरे यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सैन्यातील अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने तपासणी प्रक्रियेसाठी म्हणून सुरुवातीला १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने डॉ. देवरे यांना विश्वासात घेवून त्यांच्या भ्रमणध्वनीची माहिती घेतली. आणि डॉ. देवरे यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन ९८ हजार ९६९ रुपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे डॉ. देवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेवून सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधला. यामुळे डॉ. देवरे यांच्या बँक खात्यातील ८३ हजार रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले.

या पार्श्वभूमीवर, सविस्तर खात्री करुनच ऑनलाईन व्यवहार करावेत, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती, इंटरनेट बँकीग युजर नेम, पासवर्ड, एटीएम किंवा क्रेडीट कार्डची माहिती, ओटीपी देऊ नये, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंकवर क्लिक करु नये, एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपल्याबरोबर सायबर फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० आणी सायबरक्राईम डाॅट जीओव्ही डाॅट इन या संकेत स्थळावर जावून तत्काळ तक्रार दाखल करावी. तक्रारदाराला सायबर पोलीस ठाण्याशीही संपर्क साधता येईल. –श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)