लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव – जामनेर तालुक्यातील भिलखेडा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

भिलखेडा शेतशिवारात विलास पाटील (४५) आणि त्यांचा मुलगा शेतात कोळपणी करण्यासाठी गेले होते. पाटील हे शेतबांधावर कोळपणी करीत असताना चारीशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारीच शेतात काम करीत असलेल्या मुलासह शेतकर्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. हल्ल्यात विलास पाटील यांच्या शरीरावर बिबट्याच्या नखाचे व्रण उमटले आहेत. ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन प्रथमोपचारानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

आणखी वाचा-धुळ्यात युवकाचा खून, दोन जण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिलखेडा शिवारात बिबट्याचा संचार वाढला आहे. सध्या कोळपणी, निंदणीसह इतर शेतीकामे सुरू आहेत. त्यामुळे शेतशिवार शेतकरी व शेतमजुरांनी गजबजले आहेत. बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतमजुरांसह शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.