नाशिक : कृषि मंत्री अ’ड. माणिक कोकाटे यांच्या मागील वादाची परंपरा अखंडित सुरू आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील युवा शेतकऱ्याने कोकाटे यांच्या बेफिकरीचा निषेध नोंदवण्यासाठी कृषि मंत्री कोकाटे यांना पाच हजार५५० रुपयांची मनीअॉर्डर पाठवत माझ्यासाठीही रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा असे साकडे घातले. या अनोख्या मागणीची राजकिय वर्तुळासह जिल्हात जोरदार चर्चा आहे.
देवगाव येथील योगेश खुळे याने यंदाच्या हंगामात शेत जमिनीती पेरणीसाठी त्यांनी प्रत्येकी एक हजार ८५० रुपये किंमतीच्या तीन पिशव्या असे पाच हजार ५५० रुपयांचे बियाणे विकत घेतले. मात्र मागील दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीत पाणी साचल्याने जमीन नापीक होत आहे. पेरणीचा हंगाम संपत असतांना ही पाण्यामुळे बीयाणे अद्याप पेरता आलेले नाही. या सगळ्यात मेहनत आणि पैसे पाण्यात गेल्याचे चित्र डोळ्या समोर असतांना कृषि मंत्री कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतांनाची कथित चित्रफित नवमाध्यमातून प्रसारित झाली. त्यावर उपरोधक प्रतिक्रिया देतांना खुळे यांनी सांगितले, माझं बियाणे तसेच पडून आहे, उत्पन्न नाही. म्हणून बी बियाणे विकत मिळालेले पैसे कृषीमंत्र्यांना पाठवले आहेत.
यंदाच्या हंगामात पावसामुळे शेती उध्दवस्त झाली. नशीबाने साथ दिली नाही. शेतीतून काहीच मिळत नाही. माझ्या हातात काही उरलेले नाही. मला रमीचे ज्ञान नाही. शेतीही पडीक असल्याने बियाणे विकून मिळालेले पैसे कृषिमंत्र्यांना मनीअा’र्डरने पाठवले आहे. त्यांनी माझ्यासाठी रमी खेळावी आणि जिंकलेले पैसे पाठवावेत असे खुळे याने सांगितले.
वास्तविक शेतकऱ्यांची ही उपरोधिक प्रतिक्रिया असली तरी शेतात नैसर्गिक संकटामुळे आलेल्या आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना पशुधनासह अ्य वेगवेगळ्या कारणांनी येणाऱ्या अडचणी विषयी कृषिमंत्र्यांनी आवाज उठवणे अपेक्षित असतांना कृषिमंत्री वेळोवेळी वादग्रस्त विधाने, कार्य करत शेतकऱ्यांसह इतरांच्या संतापाला कारण ठरत आहे.
रोखठोक, परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध कृषिमंत्री माणिक कोकाटे हे भ्रमणध्वनीवर कथित रमी खेळत असलेल्या चित्रफितीमुळे विरोधकांसह शेतकरी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला आहे. मात्र, अलीकडेपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंची एकप्रकारे पाठराखण केली. कथित रमी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी असल्यास नागपूर अधिवेशनात आपण राजीनामा देऊ, असे खुद्द कोकाटेंनी सूचित केल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्याबाबत टोकाचा निर्णय घेणे टाळल्याचे मानले गेले. सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंना याआधीही उपमुख्यमंत्री पवारांनी यांनी तंबी दिली होती. तेव्हापासून सावध पवित्रा घेणारे कोकाटे हे कथित रमीत अडकले. त्यांच्या नित्यनव्या कृत्याने पक्षासह उपमुख्यमंत्री पवार यांच्याही अडचणी वाढत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्याविषयी आधीच नाराजी प्रगट केली आहे.