नाशिक – प्रकाशाचा उत्सव मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवात जळगावमधील सराफ बाजार आणि उत्तर महाराष्ट्रातील शहरी भागातील अन्य उद्योग व्यवसायांतील कोट्यवधींच्या उलाढालीची नेहमीच चर्चा होते. यंदा मात्र ग्रामीण भागात हजारो शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ मिळवत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून संबंधितांच्या घरासमोर दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन करकरीत ट्रॅक्टरचे आगमन झाले.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांंचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज ही संकल्पना राबविली जात आहे. कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाते.

याच धर्तीवर राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र आदी खरेदी करण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. विविध प्रकारातील ट्रॅक्टरसाठी किमान एक लाख ६० हजार ते कमाल चार लाखापर्यंतची अनुदान मर्यादा आहे.

या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात तब्बल दोन लाख ४६ हजार ५५९ शेतकऱ्यांची निवड झाली. योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीपूर्वी लॉटरी पद्धतीने सोडत काढावी लागली. ४४ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत कागदपत्रे अपलोड केली असून दिवाळीच्या मुहूर्तावर २५५३ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर कृषी औजारे खरेदी केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची ट्रॅक्टर घरी नेण्यासाठी लगबग सुरू होती. ग्रामीण भागातील अनेक गावात या निमित्ताने नवे ट्रॅक्टर दाखल झाले. कृषी विभागाच्या अहवालानुसार दोन लाख ४२ हजार १७० अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. एक लाख ९८ हजार ८९ शेतकऱ्यांचे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे बाकी आहे.

१८ हजार ६०५ शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून २५ हजार ४७६ शेतकऱ्यांची कागदपत्रे पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात याच प्रमाणात ट्रॅक्टर दिवाळीच्या मुहूर्तावर घरी नेल्याचा अंदाज आहे.

एकट्या मालेगाव तालुक्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर ५०० ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. राज्य कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेंतर्गत राबविलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नवी दिशा मिळून उत्पादन क्षमता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभूतपूर्व ट्रॅक्टर अनुदान उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी बांधवांनी शासनाचे आभार मानल्याचे त्यांनी म्हटले आहे.