Farmers claim that 200 chickens in the poultry breeding center in Sinnar taluka were killed by a leopard nashik | Loksatta

कुक्कुटपालन केंद्रातील २०० कोंबड्या बिबट्याकडून फस्त? वन विभागाचा विश्वास बसेना

गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातीला काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे.

कुक्कुटपालन केंद्रातील २०० कोंबड्या बिबट्याकडून फस्त? वन विभागाचा विश्वास बसेना
संग्रहित छायाचित्र

सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर आणि पशुधनावर हल्ले नेहमीचे झाले असून भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी शिवारात रविवारी मध्यरात्री बिबट्याने एका कुक्कुटपालन केंद्राची जाळी तोडून २०० कोंबड्या फस्त केल्याचे म्हटले जात आहे. शेतकऱ्याकडून करण्यात आलेल्या दाव्यावर वन विभागाकडून साशंकता व्यक्त होत आहे.

हेही वाचा- लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा नाशिकमध्ये मूक मोर्चा

भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी शिवारात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे नागरिकांना अवघड झाले आहे. बिबट्याकडून परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडत असताना आता बिबट्याने थेट कुक्कुटपालन केंद्रात शिरुन कोंबड्यांवरच ताव मारला आहे. कासारवाडी येथे वैभव देशमुख यांचे पाच हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन केंद्र आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी नवीन कोंबड्या आणल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन दिड किलोच्या आसपास आहे. रविवारी रात्री बिबट्याने केंद्राची जाळी तोडून आत प्रवेश केला. बिबट्याने अनेक कोंबड्या फस्त केल्या. कोंबड्याचा आवाज ऐकून शेजारीच राहत असलेले देशमुख यांनी केंद्राकडे धाव घेतली असता अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. जवळपास २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी केंद्राला भेट देत पाहणी केली. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती देत पंचनामा करण्याची मागणी केली. वनविभागाचे आकाश रुपवते यांनी घटनास्थळी पंचनामा केला. देशमुख यांचे यामुळे लाखांचे नुकसान झाले असून तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा- नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी

दरम्यान, बिबट्या एकाच वेळी २०० कोंबड्या कशा फस्त करणार, असा प्रश्न वन विभागाकडून उपस्थित होत आहे. बिबट्याने काही कोंबड्यांवर ताव मारण्याचा प्रयत्न केला असणार, मात्र २०० कोंबड्या फस्त होऊ शकत नाही. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहे. याआधी असा प्रयत्न झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हेही वाचा- “नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”

सिन्नर आणि अकोला तालुक्याच्या सरहद्दीवर भोजापूर खोरे परिसर असून सदरचा भाग डोंगराळ असल्याने बिबट्याचा वावर नेहमी असतो. तसेच बागायती क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी शेतात जागा मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी सोनेवाडी, कासारवाडी रस्त्यावर युवकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. परिसरात सर्वत्र रब्बी हंगामातील कामे सुरु असून काही भागात पेरण्या झाल्या. काही ठिकाणी कांदा लागवड सुरु आहे. दिवसा भारनियमन असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते त्यामुळे एकिकडे अवेळी होणारा वीजपुरवठा तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी बिबट्याची दहशत या कात्रीत शेतकरी सापडला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 19:42 IST
Next Story
लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा नाशिकमध्ये मूक मोर्चा