नाशिक: बुधवारी पहाटे दोन वाजता लागलेली आणि अतिज्वलनशील कच्च्या मालामुळे भडकलेल्या इगतपुरी येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील आगीवर ६६ तासानंतर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले. शुक्रवारी आग बरीच कमी झाल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी दिले.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यास लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह आसपासच्या जिल्ह्यांतून आणि मुंबईतील खासगी कंपन्यांची अग्निशमन दले युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. कारखान्यात ‘प्रॉपेन’नामक रासायनिक पदार्थाची टाकी असून सावधगिरी म्हणून सभोवतालचा एक किलोमीटरचा परिसर रिक्त करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आग ६० ते ७० टक्के नियंत्रणात आल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालिका अंजली आडे यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या सभोवतालचा कच्चा माल वेगळा केला गेला. त्यामुळे ती पसरण्यास प्रतिबंध झाला. अद्याप काही प्रमाणात आग कायम असून सध्या शीतकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे आडे यांनी सांगितले. कारखान्यातील अनेक विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून प्रचंड नुकसानीची शक्यता वर्तविली जाते. अडीच वर्षात या कारखान्यात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. अग्निप्रतिबंधक लेखा परीक्षणाविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादा भुसे यांच्याकडून पाहणी

जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्याला शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. सद्यस्थितीत आग विझविण्यास प्राधान्य दिले गेले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. आगीच्या दुर्घटनेत परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.