जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये एका पुरूषासह दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असून, एक चिमुरडी तेवढी वाचली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, निरीक्षक निलेश गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटना नेमकी कशामुळे घडली त्या बाबतच्या तपासाला पोलिसांनी सुरूवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले आहेत.

वरखेडी शिवारातील मुख्य रस्त्यालगतच्या मक्याच्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने बांधावर वीज तारांचे कुंपन करून त्यात वीज प्रवाह सोडलेला होता. दरम्यान, त्या शेतात मंगळवारी रात्री उशिरा प्रवास करून झोपलेल्या आदिवासी कुटुंबावर काळाने घाला घातला. विजेचा जोरदार धक्का लागून एकाच कुटुंबातील त्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब कोणत्या गावाचे राहणारे आहे आणि त्यातील मृतांची नावे काय आहेत, याची माहिती पोलिसांकडून काढण्याचे काम सुरू आहे.