धुळे – खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बनावट बियाण्याची विक्री होऊ नये याकरीता जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली असून या पथकांमार्फत बनावट बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

बियाणे, खते आणि किटकनाशकांचा गुणवत्तायुक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण सुविधा केंद्र १५ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावर दररोज सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत ९५०३९३८२५३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रारदार शेतकरी तक्रार नोंदवू शकणार आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर चार व जिल्हास्तरावर एक अशी एकूण पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा – मालेगावात सहा हरणांचे मांस जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरीत्या विक्री होणारी बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीयासारख्या अनुदानित खतांची विक्री करत असल्यास तसेच शून्य देयक पावतीवर खत विक्री करत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार जिल्हा कृषी कार्यालयास अथवा तालुका कृषी कार्यालयास करावी, असेही आवाहन तडवी यांनी केले आहे.