जळगाव : शहरातील वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर आणि व्यावसायिक पर्यटनाच्या मागणीचा विचार करता, फ्लाय ९१ या कंपनीने जळगाव विमानतळावरील सकाळच्या वेळा पुणे आणि गोव्याच्या फ्लाइट सेवा सुरू करण्यासाठी मागितल्या आहेत. त्यांसदर्भात पत्र व्यवहार कंपनीकडून विमान प्राधिकरणाकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून फ्लाय ९१ ही कंपनी जळगावहून गोवा, पुणे आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा पुरवत आहे. मात्र, या सर्व विमानांचे वेळापत्रक मुख्यतः दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवसाच्या सुरुवातीला कामकाजासाठी किंवा कनेक्टिंग फ्लाइटसाठी वेळेत पोहोचण्यात अडचणी येतात.
फ्लाय ९१ चे राष्ट्रीय महसूल प्रमुख आशुतोष चिटणीस यांनी म्हटल्यानुसार, कंपनीकडून फ्लाईटसाठी सकाळच्या वेळा उपलब्ध करून देण्याबाबत विमान प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे औपचारिक विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार, गोवा आणि पुण्यासाठी सकाळच्या फ्लाइट सुरू झाल्यास प्रवाशांना पुणे, गोवा, हैदराबाद यांसारख्या शहरांतील कामे एका दिवसात पूर्ण करून परतण्याची संधी मिळेल. तसेच जळगावला अन्य नव्या रुटवरील कनेक्टिंग फ्लाइट्सशी जोडणी साधणे सुलभ होईल.
दरम्यान, जळगाव विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पुणे आणि गोव्यासाठी सकाळच्या फ्लाइट्स सुरू संदर्भात अद्याप स्थानिक पातळीवर वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या जळगाव विमानतळावर एकाच शिफ्टमध्ये कामकाज चालते. आणि बहुतांश फ्लाइट्स दुपारी किंवा सायंकाळीच सुटतात. जळगावकरांच्या मते, विमानतळावरून सकाळच्या फ्लाइट्स सुरू झाल्यास व्यावसायिकांना पुणे, गोवा किंवा हैदराबादला दिवसाच्या पहिल्या सत्रात पोहोचता येईल. प्रवाशांचे दिवसाचे नियोजन अधिक कार्यक्षम होईल. सकाळच्या वेळी नव्याने फ्लाइट्स सुरू झाल्याने पर्यटन विकासाला चालना तर मिळेलच शिवाय जळगाव विमानतळाच्या वापरात वाढ होईल.
दरम्यान, आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू असणारी जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज सुरू झाली आहे. तर दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा देखील पूर्ववत झाली आहे. दिवाळीच्या काळात विशेषतः अहमदाबाद विमानसेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवासह पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. पैकी मुंबईसाठी अलायन्स एअर कंपनीकडून आतापर्यंत आठवड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जात होती. मात्र, प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा आठवड्याचे सर्व दिवस झाली आहे. जळगावहून मुंबई कामानिमित्त ये-जा नियमित करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय त्यामुळे झाली आहे.
