नाशिक : शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी साहित्य व दुरुस्तीच्या बाजारपेठेत परप्रांतीय आणि स्थानिक मराठी व्यावसायिकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. घाऊक आणि किरकोळ स्वरुपात साहित्य विकणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांनी भ्रमणध्वनी दुरुस्तीतही शिरकाव केल्यामुळे हे काम आधीपासून करणाऱ्या मराठी तरुणांच्या रोजगारावर गदा आल्याचा आरोप होत आहे. या वादात मनसेने उडी घेत परप्रांतीय व्यावसायिकांच्या कृतीवर आक्षेप नोंदवत अशा प्रकारे एकाधिकार राखता येणार नसल्याचे बजावले. या घटनाक्रमाचे पर्यावसान परप्रांतीय व्यावसायिकांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवण्यात झाले.

मागील काही वर्षात मध्यवर्ती भागात भ्रमणध्वनी साहित्य व दुरुस्तीची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. या ठिकाणी दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते. साहित्य विक्रीत परप्रांतीय व्यावसायिकांचे वर्चस्व आहे. परिसरातील बहुतांश दुकाने संबंधितांनी व्यापली आहेत. याच ठिकाणी मराठी युवक भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम करतात. जे परप्रांतीय व्यावसायिक घाऊक व किरकोळ स्वरुपात साहित्य विक्री करीत होते, त्यांनी दुरुस्तीही सुरू केल्याने परप्रांतीय-मराठी व्यावसायिकांमध्ये वादाला तोंड फुटले. त्यातून मंगळवारी बाजारपेठेतील व्यवहार थंडावले.

हेही वाचा…धुळे : बालिकेच्या मृत्युनंतर नाल्यात प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

एरवी हा बाजार परप्रांतीय व्यावसायिक आणि ग्राहकांमधील वादाने नेहमी चर्चेत असतो. एखाद्या ग्राहकाने वाद घातल्यावर हे व्यावसायिक क्षणार्धात एकत्र येतात. काही वेळा ग्राहकाला बेदम मारहाण झाल्याची उदाहरणे आहेत. भ्रमणध्वनी दुरुस्तीत संबंधितांनी शिरकाव केल्यामुळे अस्वस्थ मराठी व्यावसायिकांनी मनसेकडे दाद मागितली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय भ्रमणध्वनी व्यावसायिकांशी चर्चा केली. बाजारपेठेवर अशाप्रकारे एकाधिकारशाही निर्माण करता येणार नसल्याचे ठणकावले. दुरुस्तीच्या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन परप्रांतीय व्यावसायिकांनी दिले होते. या संदर्भात संयुक्त बैठक बोलावण्याचे निश्चित झाल्याचे काही व्यावसायिक सांगतात. परंतु, या दिवशी सर्व परप्रांतीय व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

परिसरात भ्रमणध्वनी साहित्याची दुकाने बंद असल्याने मुख्य रस्त्यावर ग्राहक व वाहनांची गर्दी कमी दिसत होती. भ्रमणध्वनी दुरुस्ती करणाऱ्यांची कुठलीही संघटना नव्हती. परंतु, परप्रांतीय व्यावसायिकांच्या वाढत्या दादागिरीमुळे ती तयार केली जात असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. केवळ महात्मा गांधी रस्ताच नव्हे तर, पंचवटी, सातपूर व नाशिकरोड अशा सर्व भागात परप्रांतीय व्यावसायिक मराठी युवकांचा रोजगार हिरावून घेत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या ठिकाणी दुकान असणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकाने भ्रमणध्वनी दुरुस्तीला विरोध होत असल्याचे नमूद केले. सोमवारी सायंकाळी काहीतरी वाद झाल्याचे बोलले जाते. परंतु, आपण चांदवडला गेलो असल्याने त्याची माहिती देण्यास संबंधिताने असमर्थता व्यक्त केली.

हेही वाचा…नाशिक : बसमधून मद्य तस्करी; गुजरातच्या वाहक, चालकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी बाजारात बहुतांश राजस्थानी व्यावसायिकांची दुकाने आहेत. संबंधितांना घाऊक व किरकोळ स्वरुपात साहित्य विक्री करावी. मराठी युवकांचे भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम हिरावून घेऊ नये, असे सांगण्यात आले होते. व्यवसायावर संबंधितांना एकाधिकारशाही राखता येणार नाही. याबाबत परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. संघटनेची बैठक घेऊन योग्य मार्ग काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. – अंकुश पवार (जिल्हाध्यक्ष, मनसे नाशिक)