नाशिक – नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले दुख:दायक असून या प्रश्नावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या (एआय) आधारे यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदीचा विचार असून तो अंतिम टप्पा असेल, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
नाईक हे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. श्रीमद् जग्दगुरू रामानंदचार्य दक्षिणपीठ येथे वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळ्यास ते उपस्थित होते. गेल्या शुक्रवारी नाशिक शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले. तर बिबट्याला जेरबंद करताना वनरक्षक संतोष बोडके व प्रवीण गोलाईत हे जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनमंत्री नाईक यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेत त्यांच्या धाडसाचे कौतूक केले. संबंधितांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. डॉक्टरांकडून जखमी वनरक्षकांवरील उपचाराची माहिती घेतली.
ग्रामीण भागाप्रमाणे शहरात बिबट्यांचा मुक्त संचार, वाढते हल्ले नागरिकांना भयग्रस्त करीत आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष तीव्र झाला आहे. ऊस, मका शेती, सहजपणे उपलब्ध होणारे अन्न यामुळे नागरी भागालगत त्यांचा अधिवास तयार झाल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. मागील सहा ते सात वर्षात बिबट्याने अनेकदा नाशिक शहरात शिरकाव केला आहे. त्याच्या हल्ल्यात अनेकांना जखमी व्हावे लागले. नाशिक जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातही अलीकडेच तशी घटना घडली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वनमंत्री नाईक यांनी या घटनाक्रमावर भाष्य केले. अलिकडेच एक बिबट्याला मारावे लागले. सध्या बिबट्यांची संख्या खूप वाढत आहे. कुत्र्यांप्रमाणे बिबटे फिरतील. नाशिक, अहिल्यानगर व पुणे भागातील बिबट्यांच्या प्रश्नावर सोमवारी पुण्यात बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी सविस्तर चर्चा केली जाईल. पकडले जाणारे बिबटे पुन्हा जंगल परिसरात सोडून द्यावे लागतात. पकडलेल्या बिबट्यांना वन तारा किंवा अफ्रिकेत पाठविण्याची गरज आहे. मात्र, त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बिबट्यांची नसबंदी सरकारच्या विचाराधिन असून तो अंतिम टप्पा असेल, असे वनमंत्री नाईक यांनी नमूद केले.
