धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील हे तालुक्यात कार्यरत झाले आहेत. परंतु, यावेळी कुणाल पाटील हे काँग्रेससाठी नव्हे तर, भाजपसाठी मते मागणार आहेत. संपूर्ण घराणे काँग्रेसी विचारधारेचे असताना कुणाल पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते भाजपसाठी मते मागताना दिसत आहेत. धुळे तालुक्यातील जनतेने आपणास राज्याच्या राजकारणात खरी ओळख निर्माण करुन दिली आहे.
यामुळे जय-पराजयाची चिंता न करता आपण कायमच ऋणात राहू. तुम्ही सांगाल तो शब्द प्रमाण मानु आणि यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी सेवेची परंपरा कायम ठेऊ, असे आश्वासन माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते कुणाल पाटील यांनी दिले. धुळे तालुक्यातील शिरधाणे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कुणाल पाटील उपस्थित होते. नेर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आनंद पाटील यांच्या पाठपुराव्याने शिरधाणे येथे आदिवासी स्मशानभूमीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, अंगणवाडी (क्र.२) चे बांधकाम, खिंडीमध्ये काँक्रीट रोड, नवीन वर्गखोली बांधकाम, अशी विविध विकास कामे करण्यात आली आहेत. या कामांचे नुकतेच लोकार्पण झाले.
माजी आमदार कुणाल पाटील यांनी, यावेळी धुळे तालुक्यातील जनतेचे आभार मानले. धुळे तालुक्यातील जनतेने दोन वेळा निवडून दिले. त्यामुळे खर्या अर्थाने राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण झाली. आपण स्वातंत्र्यसेनानी दिवंगत खासदार चुडामण पाटील आणि लोकनेते दिवंगत दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचा सेवेचा वारसा यापुढे कायम सुरु ठेवणार आहोत. चांगली आणि निष्ठावान माणसे बरोबर घेवून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले जाईल. निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५ जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनीच कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्राम पाटील, भास्कर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार,उपसभापती एन.डी.पाटील, माजी उपसभापती योगेश पाटील, पं.स. माजी उपसभापती कैलास पाटील, जि.प.सदस्य आनंद पाटील, सरपंच सुरेश भिल, माजी उपसभापती दिनेश भदाणे, भाजपचे मंडळ कोषाध्यक्ष कन्हैयालाल पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, संचालक रावसाहेब पाटील यांच्यासह परिसरातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
