अभियंत्यासह चार जणांना अटक, शहरातील ५६ गुन्हे उघडकीस

नाशिक : शहरात सोनसाखळीच्या चोऱ्या करुन अभियंता असणाऱ्या चोराने लाखोंची माया जमविल्याचे उघड झाले आहे. मागील दोन, अडीच वर्षांपासून साथीदाराच्या मदतीने तो हे उद्योग करीत होता.  चोराने ४८ लाख रुपयांत सदनिका आणि क्रेटा मोटार खरेदी केली. तसेच त्याच्या दोन बँक खात्यात २० लाख रुपये जमा आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात दाखल ५६ गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस उपायुक्त अमोल तांबे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वर्षांतील चोरीच्या घटनांचा अभ्यास करून चोरटे ये-जा करण्यासाठी आसाराम बाजू आश्रमालगतचा पूल, कटारिया पूल आणि कृषीनगर जॉिगग ट्रॅक रस्त्याचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशात दुचाकीवरून गस्त सुरू केली. त्या अंतर्गत सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने  मोटारसायकलवर भ्रमंती करणाऱ्या दंगल उर्फ उमेश पाटीलला ताब्यात घेण्यात आले.

संशयित पाटीलकडे तुटलेले २७ सोन्याचे मंगळसूत्र आणि अडीच लाखाची रोकड आढळली. २७ गुन्ह्यातील महिलांना बोलावून ओळखपरेड घेतली असता त्यांनी आपले दागिने ओळखले. चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनारांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

मौजमजा, जुगार, मद्य पाटर्य़ासाठी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित दंगल उर्फ उमेश पाटील हा अभियंता आहे. तुषार ढिकले या साथीदाराच्या मदतीने मौजमजा, मद्यपाटर्य़ा व जुगार खेळण्यासाठी २०१८ पासून ते नोव्हेंबर २०२० पर्यंत स्पोर्टस बाईकवरून संशयितांनी विविध ठिकाणी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा लंपास केल्या. उभयतांमध्ये बेबनाव झाल्याने नंतर उमेश हा एकटाच सोनसाखळी चोरी करत होता. चोरलेल्या सोनसाखळय़ा संशयितांनी मित्र विरेंद्र उर्फ सॅम निकम याच्या मदतीने गोपाळ गुंजाळ या सोनाराला विकल्या. गुंजाळने हा मुद्देमाल सराफ बाजारातील पंढरीनाथ वाघ यांच्या अंबिका ज्वेलर्समध्ये विकला. हे सोने वितळवून तयार केलेल्या २५० ग्रॅम वजनाच्या २० लगडी तसेच उमेशने स्वत: चोरलेल्या सोनसाखळी मुकुंद दयानकर या सोनाराला विकल्या होत्या. त्याच्याकडून ९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात आल्या आहेत.