धुळे – विनापरवाना भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी चार भ्रमणध्वनीसह धुळ्यातून ताब्यात घेतले. धुळे शहरातील न्यु शेरे पंजाब लॉजमध्ये ते थांबले असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.

धुळे शहरातील न्यु शेरे पंजाब लॉजमधील खोली क्रमांक १२२ मध्ये चार बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे अन्वेशन विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने रविवारी पथकासह लॉज गाठले. लाॅजमधील खोली क्रमांक १२२ मध्ये महंमद मेहताब (४८), शिल्पी बेगम महंमद बेताब (४३, दोन्ही रा. मानकुर, इंदिरानगर, मुंबई), ब्यूटी बेगम पोलस शेख (४५, पलकपूर, दिल्ली) आणि रिपा शेख (३०, रा. कबीर वस्ती, रोशनवाली गल्ली, दिल्ली) हे चौघे आढळले. हे चौघेही बांगलादेशातील महिदीपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू

महंमद शेख आणि शिल्पी बेगम हे पती-पत्नी असल्याचे सांगण्यात आले. चौघांकडे कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे नाहीत. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी भारतात घुसखोरी केली. शक्य तेथे काम मिळवून कायमचे वास्तव्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले. कायम वास्तव्यासाठी घराचा शोध घेत होतो, अशी माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. संशयितांच्या ताब्यातून ४० हजार रुपयांचे चार भ्रमणध्वनी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौघे आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे असलेले आयएमओ हे ॲप वापरत होते. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक, दामिनी पथक यांनी केली.

हेही वाचा – मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चारही बांगलादेशींविरुद्ध प्रकाश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील आदी पोलिसांनी या कारवाईत महत्वाची जबाबदारी पार पाडली.