नाशिक – झटपट श्रीमंतीसाठी चार ते पाच जणांनी आपल्याच मित्राच्या घरी चोरी केल्याचे उघड झाले आहे. शहरातील मुंबई नाका परिसरात ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटने चोरट्यांच्या मोटारीचा तब्बल १५७ किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६ तोळे सोने, मोटार असा ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत २४ ते २६ मे या कालावधीत भंगार खरेदी- विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचा बंगला फोडत चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही चित्रणात दोन जण संशयास्पद आढळले. हा धाका पकडत तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे इतर संशयितही निष्पन्न केले. अंमलदार आप्पा पानवळ आणि मुक्तार शेख यांना संशयित नाबीद आणि इतर हे मोटारीतून चोरीचे सोने आणि चांदी विक्रीसाठी त्र्यंबकेश्वरजवळील पहिने रस्त्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना त्याविषयी सांगितल्यानंतर पथकाने संशयितांना पहिने रोड परिसरात सापळा रचत जेरबंद केले.

संशयित हे मोटारीने पुढे जात असतांना पथकाने नाशिकमधून अहिल्यानगरपर्यंत पाठलाग केला. तब्बल १५७ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. संशयितांनी आपले भ्रमणध्वनी बंद केले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा मिळणे कठीण झाले. संशयितांपैकी एक साथीदार पहिने येथे येणार असल्याचे समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. नाबीद हाश्मी (२५, रा. नागजी हॉस्पिटलजवळ), शहबाज खान (२९, रा. वडाळारोड), उत्तम मुंजे (३०, रा. पेगलवाडी), महेश व्यवहारे (२७, रा. त्र्यंबकेश्वर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुंबई नाका परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.