लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेवेळी एकाने तोतया व्यक्तीच्या मदतीने तर दुसऱ्या उमेदवाराने छुप्या कॅमेऱ्याने प्रश्न बाहेर पाठवून ‘ब्लू टुथ’द्वारे उत्तर मागवत पेपर सोडविल्याचे उघड झाले आहे. परीक्षेत गैरप्रकार करून पात्र झालेल्या संभाजीनगर येथील उमेदवारांसह एकूण चार जणांविरुध्द म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत योगेश सावकार यांनी तक्रार दिली. रणजीत जारवाल (बोंबल्याची वाडी, खोंडेगाव, संभाजीनगर), सौरभ जारवाल (संजापूरवाडी, पारसोडा, वैजापूर) आणि त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहच्या परीक्षा केंद्रात गेल्या वर्षी १५ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. महानिर्मिती कंपनीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्या अंतर्गत पुणे विद्यार्थी गृहच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ही परीक्षा पार पडली. त्यात पात्र झालेल्या उमेदवारांच्या यादीत हा प्रकार उघड झाला. या संदर्भात ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या संस्थेने अहवाल दिल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली.

आणखी वाचा-संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल

रणजित जारवालचे अर्ज भरतानाचे छायाचित्र आणि ऑनलाईन परीक्षेच्या वेळचे छायाचित्र याच्यात तफावत दिसून आली. परीक्षेत उमेदवाराने स्वत:च्या जागी तोतया व्यक्ती बसवून गैरप्रकार केला. सौरभ जारवालने स्वत:कडील छुप्या कॅमेऱ्याने परीक्षेतील प्रश्न बाहेर पाठवले. ब्लू टूथच्या मदतीने त्याची उत्तरे मागवून तो पेपर सोडविल्याचे निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारातून संशयितांचा महानिर्मिती कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न होता, असे तक्रारीत म्हटले आहे. या निमित्ताने ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार उघड झाले आहेत. यामागे काही साखळी कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणी फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ व गैरप्रकार प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.