नाशिक – कुठे ढोल पथकांचा दणदणाट, कुठे फक्त ताशा, लेझीम, बँड अशा थाटात शहरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी गणेशाची स्थापना करण्यात आली. गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण शहर गणेशमय झाल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. दिवसभर रिमझिम पाऊस सुरु असतानाही भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही.

अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश चतुर्थीआधीच आपल्या मंडपात गणेश मूर्तीला वाजतगाजत नेले असताना गणेश चतुर्थीच्या दिवशी उर्वरित मंडळांची लगबग दिवसभर दिसून आली. सकाळपासूनच शहरातील सर्व रस्त्यांवर गणेश मंडळांचा राबता पाहण्यास मिळाला. घरगुती गणेशासाठी सहकुटुंब येणाऱ्यांमुळे शहरातील रविवार कारंजा, मेनरोड, अशोक स्तंभ ही मुख्य बाजारपेठ गजबजून गेली होती. गणेश केंद्रांमध्ये आधीच नोंदणी करुन ठेवलेल्या मूर्ती नेण्यासाठी अनेकांनी विशेष व्यवस्था केली होती. मूर्ती केंद्राजवळच लहान विक्रेत्यांनी गणेश पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री मांडली होती.

रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मंडळाचे यंदाचे १०७ वे वर्ष आहे. मंडळाच्या गणेशाचे दिमाखात आगमन झाले. त्यासाठी विशेष रथाची व्यवस्था करण्यात आली होती. ढोल पथकाचा निनाद रथापुढे होता. त्यामुळे या मंडळाच्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदा मंडळाने राजस्थानमधील खाटू शाम देखावा तयार केला आहे. शहरातील काही मंडळांची आरास अद्याप पूर्ण झालेली नाही. सततच्या पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीमुळे शहरात या वर्षी गणेश मंडळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मनपा एक खिडकी योजनेतून परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस, अग्निशमन, बांधकाम, महावितरण अशा सर्वांकडून गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मध्यवर्ती भागासह अनेक भागांत लहान-मोठ्या रस्त्यांवर गणेश मंडळांनी भव्य मंडप उभारले आहेत. गणेशोत्सवानिमित्त पोलीस दल सतर्क असून उत्सव काळात होणारी गर्दी, या गर्दीचा फायदा घेत होणारी लुटमार, या पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गणेशोत्सवानिमित्त फुलांना मागणी वाढल्याने दरही वाढल्याचे दिसून आले. सकाळपासून फुल बाजार गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा, यासाठी अनेक संस्था, संघटना दरवर्षी प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत असल्याचे यंदाही दिसून आले.

घरगुती गणेशासाठी बहुसंख्य भक्तांनी शाडु तसेच मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीला पसंती दिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धार्मिक देखाव्यांना अधिक प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.