लोकसत्ता वार्ताहर

धुळे : शहरासह जिल्ह्यात पोलिसांपुढे दररोज गुंडांचे आव्हान उभे राहत असून गुंडांकडे बंदुका येतात तरी कुठून, असा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी बंदुका घेऊन फिरणाऱ्या अशाच एका गुंडास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन गावठी बंदुका आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पारोळा रोड चौफुलीजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलसह पोलिसांनी एक लाख ३२ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली.

आणखी वाचा-नाशिकमध्ये संभाजी चौकात पाणी पुरवठा विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अग्निशस्त्र विरोधी मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कारवाईला सुरुवात झाली आहे. शंकर रेड्डी (२२, रा. विद्युत नगर, मिलपरिसर, धुळे) हा गुंड दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. रेड्डी हा पारोळा रोड चौफुलीवर मोटरसायकलवर येणार असून चहाच्या दुकानाजवळ थांबणार असल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने संबंधीत ठिकाणी सापळा रचला. रेड्डी हा येताच त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता पोलिसांना प्रत्येकी ४० हजार रुपये किंमतीच्या दोन गावठी बंदुका आणि दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा ऐवज मिळाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे नीलेश पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रेड्डीविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.