नाशिक – गणरायाला निरोप देण्याची घटिका समीप आली आहे. गणरायाच्या मुक्कामात त्याच्या सरबराईत काही कमी पडू नये यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. ही धडपड नोकरदार महिलांना जमतेच असे नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये उत्सव काळात तयार नैवैद्याकडे कल वाढला. यंदा ही स्थिती कायम असली तरी महागाईमुळे खरेदीत हात आखडता घेतला जातो. म्हणजे एक किलोऐवजी अर्धा किलो पदार्थ खरेदी केले जातात. असे विक्रेते सांगतात.

गणपतीच्या आगमनानंतर अवघ्या काही दिवसात लाडक्या गौराईचे आगमन होते. उत्सव काळात गणराय तसेच गौराईच्या सरबराईत कमी पडू नये यासाठी प्रत्येकाकडून नियोजन केले जाते. यात महिलांसह पुरूष वर्गाचे कौशल्य पणास लागते. तळणीचे मोदक, पान मोदक, गुलकंद मोदक, खव्याचे मोदक असे मोदकाचे विविध प्रकार त्यानंतर दहा दिवसात गणरायाच्या आरतीसाठी विविध पदार्थ नैवैद्य म्हणुन दाखवले जातात.

गौराईच्या मुक्कामातही सोळा भाज्या, पुरणपोळी, खीर, आमटी, अळुच्या वड्या, तळण, कोशिंबीर असे विविध पदार्थ व दिवाळीतील फराळ नैवैद्य म्हणुन ठेवला जातो. मुळात उत्सव काळात महिला वर्गाच्या कामात वाढ होते. नैवेद्य तयार करण्यासाठी अनेकांकडे पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे बहुतेकांकडून फराळ अथवा अन्य तयार पदार्थांच्या नैवेद्याला पसंती दिली जाते. मागील काही वर्षात तयार फराळ, नैवैद्य मागवण्याचे प्रमाण वाढले आहे.

याविषयी सुनिता दीक्षित यांनी सांगितले, गौरी असो गणपतीच्या दिवसात तयार स्वयंपाक नैवैद्यासह मागवण्यात येतो. साधारणत: प्रति थाळी २०० रुपयांच्या पुढे दर असतात. ताटातील जिन्नस प्रमाणे दर ठरतात. काही लोक घरी नैवैद्य करतात. अन्य नातेवाईकांसाठी स्वयंपाक मागवतात. तर काही केवळ नैवैद्य मागवतात. वाढलेल्या महागाईने ताटांच्या दरात वाढ झाली आहे.

नेटीव्ह ट्रिटसचे आकाश अंधारे यांनी उत्सव काळात तयार नैवेद्यासाठी प्रतिसाद वाढला असला तरी महागाईमुळे ग्राहक खरेदी करताना विचार करतात, याकडे लक्ष वेधले. यामुळे काही जण एक किलोच्या ऐवजी अर्धा किलो अशा प्रमाणात कमी खरेदी करतात. अनेक घरात माणसे कमी झाल्यानेही प्रतिसाद कमी झाला. यामध्ये दिवाळीतील फराळ, लाडु, चिवडा, करंजी, चकली यासह अन्य पदार्थांना मागणी होती. पण वजनी कमी प्रमाणात गेले. वाण सामानाचे दर वाढल्याने याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

तयार फराळाला मागणी..

बाहेरील आणि घरातील कामे पाहता गौराईसाठी लागणारा फराळाचा नैवैद्य बाहेरून मागवला. वाढलेली महागाई पाहता कमी प्रमाणात मागवले. तसेच उकडीच्या मोदकाच्या किंमती पाहता घरीच मोदक तयार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उत्सवाचा आनंद घेता येतो. – प्रज्ञा काकडे (गृहिणी)