नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी संघटना वर्ग तीन आणि वर्ग चार या संघटनेच्या वतीने येथे आदिवासी विकास भवन प्रवेशद्वारासमोर दिलेला ठिय्या १९ व्या दिवशीही कायम होता. आंदोलनकर्त्यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेत. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.
बाह्यस्त्रोतास आक्षेप घेतांना कायमस्वरूपीपेक्षा कंत्राटी म्हणून कामावर रुजू होऊ द्यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने मागील १८ दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर बिऱ्हाड मोर्चा आंदोलन सुरू आहे. सुरूवातीला काही आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली. आंदोलन अधिक दिवस लांबल्याने शिदोरी कमी पडत असल्याने आता आंदोलक स्वत: आंदोलनस्थळी चूल मांडत आपला स्वयंपाक स्वत: शिजवत आहेत. काही आंदोलकांनी अन्नत्याग केला. यातील प्रा. तुळशीराम खरोटेंनी १२ दिवसांपासून अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधल्या काळात आंदोलकांची मंत्री नरहरी झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांनी भेट घेतली. आंदोलकांनी मुंबई गाठत मनसे नेते राज ठाकरे यांना प्रलंबित मागण्यांबाबत साकडे घातले. मात्र अद्याप या प्रश्नांचा तिढा सुटलेला नाही.
दरम्यान, आंदोलनाच्या १९ व्या दिवशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आंदोलकांनी भेट घेतली. या बैठकीत १७ जून रोजी महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीची आठवण करून देत त्यानंतर झालेल्या चर्चेप्रमाणे कुठलीही कारवाई झाली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुढील दोन दिवसात बैठक घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.