जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यावरून सुमारे ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा करून पुन्हा एकदा खडसेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार खडसे यांच्या बंगल्यावरून सोने, चांदीसह रोख रक्कम चोरीला गेली असताना, सीडी जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढणाऱ्या त्या सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले आहे. ईडीसह इतर आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशा सुरू असताना आमदार खडसे यांनी अनेकदा त्या कथित सीडीचा उल्लेख करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. तुमच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे, असे वक्तव्य विविध सभांमध्ये करून आपल्या विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्या काळात नागरिकांपासून ते खडसेंच्या राजकीय विरोधकांपर्यंत सर्वांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला होता, की अखेर त्या सीडीत असे आहे तरी काय ? प्रत्यक्षात, खडसे यांनी त्या सीडीचा एकप्रकारे ढाल म्हणूनच वापर केला.
ईडी आणि इतर तपास संस्थांच्या कारवायांमुळे त्यांच्यावर संकटाचे ढग दाटले असताना, त्या सीडीचा उल्लेख करून त्यांनी आपल्या विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, विशेषतः भाजपमधील त्यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन काही काळ सावध भूमिकेत राहिले. तथापि, चौकशांसह दंडात्मक कारवाया आणि राजकीय दडपण वाढूनही खडसे यांनी ती कथित सीडी कधीच सार्वजनिक केली नाही. त्यामुळे त्या सीडीचे अस्तित्व खरे होते की फक्त राजकीय डावपेच, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. मात्र, खडसेंच्या जळगाव शहरातील बंगल्यात झालेल्या चोरीनंतर ती कथित सीडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. चोरट्यांनी घरातून सोने, चांदी, रोकडसह सीडी, पेन ड्राइव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी उघडपणे त्यांना सोन्या-चांदीपेक्षा सीडी चोरीला गेल्याचे अधिक दुःख झाल्याचे म्हटले देखील आहे. तसेच चोर नेमके दागिने आणि रोकड चोरण्यासाठी आले होते की त्या सीडीमागेच काहींचा डाव होता?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. खडसेंनी थेट कोणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या त्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्याकडे ठोस पुरावे आहेत आणि योग्य वेळी ते पोलिसांना सुपूर्त करू, असेही खडसेंनी म्हटले आहे. दुसरीकडे, मंत्री महाजन यांनी चोरीच्या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना आपल्या नेहमीच्या शैलीत खडसेंना टोमणे मारण्याची संधी साधली आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
काय म्हणाले मंत्री महाजन ?
खडसे कुटुंबियांच्या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा पडला, तेव्हा मी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा कार्यक्रमात होतो. दुसरी चोरी त्यांच्या जळगावमधील बंगल्यावर झाली तेव्हाही मी अमित शहांसोबत होतो. त्यामुळे खडसे माझे नाव घेत असतील तर माझ्याजवळ पुरावा आहे, की मी चार दिवस जिल्ह्याबाहेर होतो. चोऱ्या-माऱ्या करणे काही माझा धंदा नाही. चोरी करणारे उल्हासनगरचे राहणारे होते आणि जळगावात त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते, हे सर्व पोलीस चौकशीत समोर आले आहे. माझे तर काही उल्हासनगरच्या चोरांशी संबंध नाहीत. किंवा मी त्यांना सांगितले सुद्धा नाही की खडसेंच्या घरात चोरी करा म्हणून, असा टोला मंत्री महाजन यांनी हाणला. तसेच लोकांनाही कळतयं की कोण काय बोलतयं, त्यामुळे फार शिळ्या कढीला ऊत आणू नका, असाही सल्ला त्यांनी खडसेंना दिला.
