नाशिक – कुंभमेळा नियोजन, महापालिकेशी संबंधित कामे अथवा अन्य कुठल्याही विषयांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून साधी विचारणाही होत नसल्याने भाजपच्या स्थानिक आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तशीच स्थिती नाशिकच्या पालकमंत्रिपदाचे घोंगडे भिजत पडल्याने मित्रपक्षांची देखील झाली आहे.
प्रशासनावर पकड मिळवून कुंभमेळामंत्री महाजन यांच्याकडून पालकमंत्रिपदाच्या थाटात कारभार सुरू झाला आहे. भाजप व मुख्यत्वे गिरीश महाजन यांना शह देण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या रविवारी होणाऱ्या नाशिक दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गृहमंत्री शहा यांना विमानतळावर निरोप दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे शासकीय विमानाने नाशिकला येतील. सहा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सातपूर येथील डेमोक्रसी सभागृहात बुथप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सुट्टीच्या दिवशी शासकीय अधिकाऱ्यांशी विचार विनिमय हा मंत्री महाजन यांचे प्रशासकीय वर्चस्व कमी करण्याचा भाग मानला जातो.
कुंभमेळ्यामुळे महत्व प्राप्त झालेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या तीनही पक्षात बराच सुप्त संघर्ष झाला. भाजपने ते जळगावचे गिरीश महाजन यांना देण्याचे ठरवले होते. त्यामुळे नाशिकमध्ये पाच आमदार असूनही कुणाचा मंत्रिपदासाठी विचार झाला नाही. पालकमंत्रीपदी महाजन यांच्या नियुक्तीत शिवसेना शिंदे गटाने खोडा घातल्यानंतर भाजपने ते आजवर मित्रपक्षांना मिळू दिलेले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदावर मध्यंतरी दावा सांगण्याचा प्रयत्न केला. तेही यशस्वी ठरले नाही.
अलीकडच्या काळात कुंभमेळामंत्री महाजन हे जणू पालकमंत्री असल्याप्रमाणे वावरतात. गोदावरी नदीची पूर पाहणी असो की रस्ता दुरुस्तीचा विषय असो सर्व सूत्रे महाजन यांच्या हाती एकवटली आहे. प्रशासकीय यंत्रणाही महाजन यांच्या सूचनेबरहुकुम चालते. महापालिका निवडणुकीत महाजन यांचे वाढते वर्चस्व शिंदे गटालाही अडचणीचे ठरू शकते. कुंभमेळा तयारीसाठी स्थापलेल्या मंत्री समितीतील मंत्र्यांनाही कोणी पुसत नाही, कुंभमेळ्याशी संबधित कार्यक्रमाना निमंत्रित करीत नाही. यामुळे पालकमंत्रीपद हुकलेले दादा भुसे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे यांच्यात अस्वस्थता आहे.
महाजन यांच्या प्रभावाची भाजपसह मित्रपक्षांनाही झळ बसत आहे. भाजपचे आमदार निवेदने व पाठपुरावा करण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही. मित्रपक्षांंना तसे निर्बंध नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रविवारी सायंकाळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी होणारी चर्चा , हा त्याचाच एक भाग मानला जातो. मंत्री गिरीश महाजन यांच्या कारभाराला चाप लावण्यासाठी शिवसेना शिंदे गट उत्सुक असल्याचे दिसून येते.