लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे गरम तेलाच्या कढईत पडून सहा वर्षाच्या बालिकेचा भाजून मृत्यू झाला. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
वैष्णवी पवार असे चिमुकलीचे नाव आहे.
लखमापूर येथे समाधान पवार यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. ते आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्यपदार्थ तयार करत होते. शेव तयार झाल्यावर गरम तेलाची कढई बाजूला ठेवून त्यांनी दुसऱ्या कामाला सुरूवात केली. त्याचवेळी गरम तेलाच्या कढई जवळ त्यांची मुलगी वैष्णवी (सहा) ही गेली. खेळता खेळता तोल गेल्याने तेलाने भरलेल्या कढईत ती पडली. वैष्णवी कढईत पडल्याचे लक्षात येताच पवार यांनी तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात असतांनाच तिचा मृत्यू झाला.