नाशिक – देवळा तालुक्यातील खामखेडा येथे घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

देवांशी सोज्वळ असे या बालिकेचे नाव आहे. खामखेडा येथील कोळीवाडा वस्तीत आकाश सोज्वळ कुटुंबिय वास्तव्यास आहे. आकाश यांची कन्या देवांशी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत होती. आई घरकामात व्यस्त असताना देवांशी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे कधी गेली, हे कोणालाच समजले नाही. बराच वेळ मुलीचा आवाज न आल्याने शोधाशोध सुरु झाली असता देवांशी पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. कुटुंबियांनी तिला तातडीने खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले.