स्मार्ट सिटी परिषदेत पालकमंत्र्यांकडून विकासाची ग्वाही

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसोबत ‘गोदा पार्क’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या गोदा उद्यान संकल्पनेला महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट केल्याने उलटसुलट प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या या परिषदेत महापौर रंजना भानसी, आ. बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नॉर्वेच्या दूतावास अधिकारी अ‍ॅन ओलेस्टड, विभागीय आयुक्त महेश झगडे, मनपा आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा आदी उपस्थित होते.

महाजन यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच शहर विकासाचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. देशात एकूण ९८ शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. राज्यातील नाशिकसह विविध शहरांत प्रकल्पाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नाशिकमध्ये विकासाची मोठी क्षमता आहे. त्याचा उपयोग करून महानगराचा सर्वागिण विकास करण्यासाठी शासन सहकार्य करेल. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीने परिपूर्ण जीवनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात ‘स्मार्ट शहर’ अशी ओळख प्रस्थापित करण्यात नाशिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराच्या सौंदर्यासोबत स्वच्छतेलाही महत्त्व दिले जात आहे. परिषदेच्या माध्यमातून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी नव्या संकल्पना पुढे येतील असे महाजन यांनी सूचित केले.

महापौर भानसी यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रोड’ तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. अशोकस्तंभ ते मॉडर्न सर्कल दरम्यान पहिल्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल असे त्यांनी नमूद केले. झगडे यांनी शहरांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.

या स्थितीत शहर विस्ताराचे योग्य नियोजन होणे गरजेचे असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. नियोजनाद्वारे रोजगार आणि संपत्तीची निर्मिती, उत्तम मानव विकास निर्देशांक आणि शाश्वत पर्यावरण संवर्धन या बाबी स्मार्ट शहरासाठी आवश्यक आहेत. शहरातील मूलभूत समस्या दूर करूनच शहर स्मार्ट करता येईल. शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, रोजगार, वाहतूक, आवास अशा विविध पैलूंचा विचार या संदर्भात होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी जोसेफ, आयटीडीपीचे हर्शद अभ्यंकर, यूएसटी ग्लोबचे कार्तिक हरिहरन

यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या विविध पैलूंबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. भारत हा नॉर्वेप्रमाणे सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न देश असून ऊर्जा, पायाभूत सुविधा, पर्यावरण, संरक्षण आदी क्षेत्रात दोन्ही राष्ट्रात सहकार्याचे वातावरण असल्याचे ओलेस्टड यांनी सांगितले.

लवकरच ई प्रमाणपत्र सुविधा

नागरिकांना शहराचे आकर्षण वाटावे अशा सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी नदीघाट विकास, सीसी टीव्ही आणि इतरही प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून लवकरच ई-प्रमाणपत्र सुविधा सुरू करण्यात येईल, असे पालिका आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

मनसेच्या संकल्पनावर भाजपची स्मार्ट सिटी

गोदा उद्यान ही संकल्पना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली होती.  स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसोबत ‘गोदा पार्क’  हा राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.  शहराला स्मार्ट करताना मनसेच्या संकल्पना अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ठरल्याचे अप्रत्यक्षपणे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी अधोरेखीत केले. यामुळे मनसेच्या अनेक प्रकल्पांना स्मार्ट सिटीच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्या संकल्पनांवर भाजप स्मार्ट सिटीचे घोडे पुढे दामटत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.