संततधारेमुळे गोदावरी काठोकाठ

सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संततधारेमुळे सोमवारी गंगापूर धरणातील विसर्ग चार हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरीचे पाणी सोमवारी प्रथमच दुतोंड्या मारुतीच्या छातीजवळ आले. (छाया-यतीश भानू)

गाळ, काँक्रिट काढल्याने पातळीत घट; स्मार्ट सिटी कंपनी अभ्यास करणार

अनिकेत साठे
नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संततधारेमुळे सोमवारी गंगापूर धरणातील विसर्ग चार हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. शहर परिसरातील लहान नद्या, नाल्यांमधून येणारे पावसाचे पाणी पात्रात मिसळत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली. रामवाडी परिसरात पात्रातील गाळ  तसेच रामकुंडलगतच्या पात्रातील काँक्रिटीकरण काढले गेल्याने पुराची तीव्रता कमी करण्यास त्याचा लाभ होत असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनी करीत आहे. धरणातून विसर्ग झाल्यानंतर गाळ काढण्यापूर्वी प्रवाहाची पातळी आणि गाळ काढल्यानंतरची पातळी याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

गंगापूर धरण तुडूंब भरल्याने पावसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सोमवारी दुपारी होळकर पुलाखालून सात हजार ८३० क्युसेक विसर्ग सुरु होता. यावेळी पाणी पातळी १८४६ फूट होती. विसर्ग २० हजार क्युसेकवर गेल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. पुराचा पारंपरिक निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीजवळ पाणी आले आहे.

गोदा पात्रातील अतिक्रमणे, कमी उंचीचे पूल, पूररेषेतील बांधकामे, कुंभमेळ्यात बांधलेले घाट, पात्रात टाकला जाणारा भराव अशा अनेक कारणांनी पुराची तीव्रता वाढत असल्याचे  २००८ मधील महापुराच्या चौकशीत उघड झाले होते. होळकर पुलाखालील बंधाऱ्यामुळे मागील भागात फुगवटा वाढतो.  पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी बंधाऱ्यावर नवीन दरवाजे बसविणे, पात्रातील गाळ आणि काही कुंडातील काँक्रिटीकरण काढण्याचे निश्चित झाले. त्यानुसार काही कामे काही प्रमाणात झाली असली तरी बंधाऱ्यावर दरवाजे बसलेले नाही. या कामाचे दृश्य परिणाम गंगापूरमधून विसर्ग  झाल्यानंतर दिसत आहे. होळकर पुलापर्यंत संथ दिसणारे पाणी रामकुंडाकडे (बंधाऱ्यातून ) पात्रात वेगाने जाते.

रामवाडीलगतच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला होता. रामकुंड परिसरातील काही कुंड काँक्रिटमुक्त करण्यात आले. त्याचा निश्चितपणे फायदा झाल्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे म्हणणे आहे. गाळ काढण्याचे काम अपूर्ण आहे. गंगापूर रस्त्यावरील वन विभागाच्या रोपवाटिकेपर्यत हे काम करायचे आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या कामावर गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी आक्षेप नोंदविला होता. कोट्यवधी रुपये खर्चून पात्रातून मातीचा उपसा करण्यात आला. त्याचा कुठलाही हिशेब ठेवला गेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. रामकुंडाखालील भागात काही कुंडातील काँक्रिटट काढल्यामुळे प्रवाहातील अडसर काहीअंशी दूर झाल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु, गाळ काढल्यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास फायदा झाला नसल्याकडे जानी यांनी लक्ष वेधले.

गोदापात्रातील गाळ, काँक्रिटीकरण काढल्याने पुराची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे. नागरिकांची काही मत-मतांतरे असली तरी या सर्व तांत्रीक बाबी आहेत. गेल्या वर्षी विशिष्ट विसर्गानंतर पात्रातील पाणी पातळी किती होती आणि या वर्षी तितक्याच विसर्गानंतर पात्रातील पातळी किती आहे, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यातून नेमका काय फायदा झाले ते स्पष्ट होईल. पात्रातील गाळ काढण्याचे शिल्लक काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे.

– सुमंत मोरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Godavari river due to continuous flow ssh