जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या चार दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर स्थिर होते. मात्र, मंगळवारी बाजार उघडताच किमतीत मोठी वाढ नोंदवली गेल्याने दोन्ही धातुंनी पुन्हा नवीन उच्चांक केल्याचे दिसून आले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली जात आहे. बुधवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीत व्याज दरात कपात होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे गुंतवणुकदारांचा ओढा सोन्याकडे अधिक वाढला आहे. फेड व्याज दरात कपात करत राहिल्यास वर्ष अखेरीस आणखी शिथिल आर्थिक धोरण लागू होण्याची शक्यता आहे. या संभाव्य बदलांचा थेट परिणाम जागतिक कमोडिटी बाजारावर झाला असून सोन्याच्या किमतींना जोरदार पाठबळ मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय वायदा बाजारात डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर ३७२८.३२ डॉलर प्रति औंस इतक्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी सोन्याने एवढा उच्चस्तर कधीच गाठला नव्हता. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे मागणी वाढत असून, सोन्याच्या किंमतीत उत्तरोत्तर वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असल्याने जागतिक किमतींच्या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसू लागला आहे. जळगावमधील बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

आगामी सणासुदीच्या काळामुळे मागणी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक बाजारात दर आणखी तेजीत येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत १२ सप्टेंबरला सोने आणि चांदीच्या दराने सर्वकालीन उच्चांक केला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही धातुंच्या दरात फार चढ-उतार दिसून आले नाहीत. तरीही गेल्या काही दिवसातील उलथापालथ लक्षात घेता सोने, चांदीच्या दराची अनिश्चितता कायम असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांनी त्याची धास्ती मोठी घेतली होती.

प्रत्यक्षात सोमवारी जळगावमध्ये दिवसभरात २०६ रूपयांनी घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार ६०९ रूपये नोंदविला गेला. परंतु, मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात ७२१ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे १२ तारखेचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ३३० रूपयांपर्यंत पोहोचले.

चांदीत १०३० रूपयांनी वाढ

जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३३ हजार ९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो एक लाख ३४ हजार ९३० रूपयांपर्यंत पोहोचले.