नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र कायम असून पाथर्डी शिवारातील गामणे मैदान भागात दोन दिवसांत सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. दुचाकीवर आलेल्या चोरांनी पादचारी महिलांचे सुमारे पावणे दोन लाखांचे मंगळसूत्र, सोन्याची पोत खेचून नेले. जायभावे नगरात राहणाऱ्या रिया मांजरेकर (६०) या बुधवारी रात्री परिसरातील गामणे मैदान भागातील भाजी बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून घराकडे पायी येत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांची सुमारे ४० हजार रुपयांची पोत हिसकावून पलायन केले. याच काळात प्रशांतनगर येथील सावली मेडिकलसमोर सोनसाखळी चोरीची घटना घडली.

दुर्गा धोंडगे (अलकापुरी सोसायटी, प्रशांतनगर) या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपयांची सोनसाखळी ओरबाडून नेली. या दोन्ही घटनांप्रकरणी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना आव्हाड पेट्रोलपंप भागात घडली. याबाबत सुजाता शिंदे (जायभावेनगर,पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. शिंदे दाम्पत्य गुरूवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. आव्हाड पेट्रोलपंप परिसरातून पायी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरांनी सुजाता शिंदे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मागील काही वर्षात सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढत आहेत. चालू वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत ६१ प्रकार घडल्याची आकडेवारी आहे. गतवर्षी म्हणजे २०२४ मध्ये वर्षभरात १२६ तर २०२३ या वर्षात १०६ घटना घडल्या होत्या. याबाबतची आकडेवारी पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

घरफोडीत पावणेनऊ लाखाचा ऐवज लंपास

कामगारनगर येथील सुयोग कॉलनीतील घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाचा ऐवज चोरून नेला. याबाबत बिंदू वासव (चिरागदीप बंगला, सुयोग कॉलनी) यांनी तक्रार दिली. वासव कुटूंबिय उद्योजक असून त्यांचा औद्योगिक वसाहतीत कारखाना आहे. सोमवारी रात्री कुटूंबिय बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉॅप, डीव्हीआर असा सुमारे आठ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

जेलरोड-नांदूरनाका दरम्यान दोन दुचाकीच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रत्नाकर रायकर (निसर्गनगर,नांदूरनाका) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रायकर हे बुधवारी नाशिकरोड भागात गेले होते. रात्री ते परतत असतांना हा अपघात झाला. जेलरोडमार्गे ते नांदूर नाक्याच्या दिशेने दुचाकीवर जात असताा बुध्द विहारासमोर दुचाकीने धडक दिल्याने रायकर गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियानी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. मनिष छाजेड यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.