जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत ट्रम्प टॅरिफच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. बुधवारी देखील सोने दराने आधीचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक केला. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना चांगलाच हादरा बसला.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वाढीमागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. सोन्याला सुरक्षित मालमत्ता मानले जाते आणि जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार अशा सुरक्षित पर्यायांकडे वळतात. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

व्याजदर कमी झाल्यास अमेरिकन डॉलर कमकुवत होतो. जेव्हा डॉलर कमजोर होतो, तेव्हा डॉलरमध्ये खरेदी केले जाणारे सोने इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी स्वस्त होते, ज्यामुळे सोन्याची मागणी आणि किमती वाढतात. याशिवाय, जगभरातील विविध देशांमधील राजकीय आणि लष्करी तणाव तसेच व्यापार युद्धांसारख्या घटनांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची निवड केली जाते.

दुसरीकडे, सध्या इक्विटी आणि बाँड बाजारांमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार आणि बाँडमधील कमी परतावा यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याची निवड करत आहेत. अमेरिकेने इतर देशांवर लावलेले आयात शुल्क (टॅरिफ) आणि त्यासंबंधीची अनिश्चितता यामुळेही जागतिक बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. परिणामी, गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत आणि सोन्याचे भाव वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

याव्यतिरिक्त, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेतही मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार २५३ रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी बाजार उघडताच ९२७ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख नऊ हजार १८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

चांदीचे दर स्थिर

जळगावात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह एक लाख २८ हजार रूपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, नंतरच्या दोन दिवसात चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. बुधवारी देखील चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार २३५ रूपये होते.