जळगाव : अमेरिकन प्रशासनाने भारतीय आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या किमती रक्षाबंधन सणापूर्वी नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, चांदीही आता एक लाख २० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. दोन्ही धातुंच्या किमतीत झालेल्या वाढीने ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच चक्रावले आहेत.

जळगावमध्ये गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ३३९ रूपयांपर्यंत होते. शुकवारी सकाळी बाजार उघडताच २०६ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. चांदीचे दर गुरूवारी एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर चांदीत कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. चांदीचे दर स्थिर राहिले. अलिकडच्या काळात सोन्याच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमागे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवरील वाढता व्यापारी तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. अमेरिकन प्रशासनाने भारतीय आयातीवर २५% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.

अशा वेळी गुंतवणूकदार आपली भांडवली जोखीम कमी करण्यासाठी पारंपारिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे वळले आहेत. ज्यामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढून त्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सोन्याच्या किमती वाढण्यामागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे डॉलरची घसरण आणि अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थिती. त्यातच, रशियावर लादलेले नवे निर्बंध आणि चिप आयातीवर १००% शुल्क आकारण्याचा अमेरिकेचा इशारा यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड केल्याचे बोलले जात आहे.

परिणामी, वाढते जागतिक व्यापार शुल्क आणि तीव्र होत चाललेले भू-राजकीय तणाव यांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. चांदीनेही गेल्या दोन दशकांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मागील २० वर्षांत तिच्या किमतीमध्ये तब्बल ६६८.८४% वाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून चांदीचा दर प्रति किलो एक लाखाच्या पुढेच स्थिर आहे, ज्यातून चांदीची मजबूत मागणी आणि किमतीतील स्थिरता स्पष्टपणे दिसून येते.

सोन्याची किंमत कशी ठरवितात ?

भारतात सोन्याची किंमत ठरविताना आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क, इतर कर, रुपया-डॉलर विनिमय दर, तसेच देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याचा समतोल, या घटकांचा विचार केला जातो. देशात सोने केवळ गुंतवणुकीचे साधन नसून लग्न सोहळा, सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये त्याला विशेष स्थान आहे. त्यामुळे किमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर जाणवतो, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.